नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस ‘मॉनिंग वॉक’वर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sandip Karnik

दररोज सकाळी पायी फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉक) जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पथके नेमली आहेत.

Pune Police : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस ‘मॉनिंग वॉक’वर

पुणे - दररोज सकाळी पायी फिरण्यासाठी (मॉर्निंग वॉक) जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पथके नेमली आहेत. पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ‘मॉनिंग वॉक’मध्ये सहभाग घेत नागरिकांशी संवाद साधला.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार घेतल्यापासून शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी तसेच विशेषत: महिला आणि ज्येष्ठांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना राबविण्यास सुरवात केली आहे. आयुक्त रितेश कुमार यांनी रेल्वे स्टेशन, बस डेपो, बाजारपेठ, उद्यानासह मॉर्निंग वॉकसह गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची उपस्थिती वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गर्दीच्या वेळी पायी गस्त (फूट पेट्रोलिंग) आणि मॉर्निंग वॉक स्क्वॉड नेमण्यात आले आहेत.

अतिरिक्त पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त आणि सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी हे त्याठिकाणी भेटी देणार आहेत. तसेच, नागरिकांसोबत संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा करणार आहेत.

या मोहिमेंतर्गत १५ मार्च रोजी सकाळी शहरातील विविध ठिकाणी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मॉर्निंग वॉकमध्ये सहभाग घेत नागरिकांसोबत संवाद साधला. यामध्ये पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त पश्चिम राजेंद्र डहाळे, अतिरिक्त आयुक्त पूर्व रंजन शर्मा, परिमंडळ-१चे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, परिमंडळ-२ च्या पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, परिमंडळ-३चे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा, परिमंडळ-४ चे पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे, परिमंडळ-५चे पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त आणि पोलिस निरीक्षक, कर्मचारी सहभागी झाले होते.