कुंपणच शेत खायला लागल्यावर कसं होणार हो ?

pune-city-Police.jpg
pune-city-Police.jpg

पुणे : वाहत्या सातारा रस्त्याच्या फूटपाथवरच महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यानं महापालिकेची मोटार लावली अन् सेवेस तत्पर असलेल्या वाहतूक पोलिसांनी तिला जॅमर लावला. देवदर्शन करून परतलेला तो अधिकारी तडकला अन् 'मी सहायक आयुक्त आहे, गाडी सोडा...' असा हुकूम फर्मावला. बाणेदार पोलिस निरीक्षकांनी तो साफ धुडकावला. त्यानंतर गाडी सोडून माननीय अधिकारी अन्य वाहनानं रवाना झाले, पण 'दंड भरल्याशिवाय गाडी सोडणार नाही' असा पवित्रा पोलिसांनी घेतल्यानं प्रदीर्घ काळ मोटार फूटपाथवरच उभी राहिली.
 
त्याचं झालं असं. सातारा रस्त्यावरच्या शंकरमहाराज मठामध्ये समाधीच्या दर्शनासाठी गुरूवारी मोठी गर्दी होते. एम. एच. 12 ए. एच. 8799 या क्रमांकाची महापालिकेची मोटार वापरणारे महापालिकेचे एक माननीय अधिकारी गुरूवारी सकाळी भक्तिभावानं दर्शनाला येतात. नेहमीप्रमाणेच आज सकाळीही ते महापालिकेच्या मोटारीनं आले अन् त्यांनी मठासमोरच्या फूटपाथवर मोटार लावली. ते दर्शनाला गेल्यावर वाहतूक पोलिसांची नजर 'त्या' मोटारीकडे वळली. त्यांनी तिला जॅमर लावून टाकला. 

दर्शन करून परतलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याचा मात्र तिळपापड झाला. त्यांनी त्या वाहतूक पोलिसांना दमात घेण्यास सुरूवात केली. "मी महापालिकेचा सहायक आयुक्त आहे, गाडी सोडा' असा धोशा त्यांनी लावला. ते ऐकल्यावर मात्र पोलिसांपैकी पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक पुढे झाले आणि त्यांनी आपल्या पद्धतीनं ही 'केस' हाताळायला सुरूवात केली.
 
"अहो, तुम्ही महापालिकेचे अधिकारी असाल, पण तुम्हीच कायदा मोडायचा का ?...'' 
"मला सांगू नका, हा फूटपाथ नाहीच, माझ्याकडं नकाशे आहेत, मी तुम्हाला दाखवतो...'' 
"साहेब, तुमच्या महापालिकेच्याच कायद्यानुसार रस्त्यावर, फूटपाथवर गाडी लावणं बेकायदेशीर आहे, तुम्हीच कायदा मोडायला लागला तर, कसे होणार हो ?'' 
आपल्या या दमानं पोलिस ऐकत नाही, हे लक्षात आल्यावर महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यानं दुसरं अस्त्र काढलं... 
"खासदार गिरीश बापटांनी मिटींग बोलावलीये, तिकडे मला अर्जंट जायचयं, मला सोडा...'' 
"तुम्ही जा, पण दंड भरल्याशिवाय गाडी सोडणार नाही, कुंपणच शेत खायला लागल्यावर कसं होणार हो ?...'' पोलिस निरीक्षक पुराणिक यांचा रामशास्त्री बाणा... ! 
पालिकेच्या अधिकाऱ्यानं मग आपल्या साहेबालाच फोन लावला अन् तो पुराणिकांच्या हातात दिला. पुराणिकांनी त्या अधिकाऱ्यासमोरही आपली कर्तव्यदक्षतेची गीता ऐकवली. 

आपली कुठलीच मात्रा चालत नाहीये, असं लक्षात आल्यावर तो अधिकारी चिडचिड करत दुसऱ्या वाहनानं रवाना झाला. मोटार सांभाळत मागं राहिलेल्या ड्रायव्हरला अधिकाऱ्याचं नाव विचारलं तर तो म्हणाला, "मी आज पहिल्यांदाच या साहेबांकडं आलोय, ते वॉर्ड ऑफिसर आहेत.' संबंधित अधिकारी सहायक आयुक्त नसून वॉर्ड ऑफिसर आहेत, हे त्यामुळं कळलं. 
तयार केलेली दोन हजार रूपये दंडाची पावती पुराणिक यांनी दाखवली, मात्र, त्यानंतर बराच काळ महापालिकेकडून मोटार सोडवून घेण्यासाठी कुणीच आलं नव्हतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com