नववर्ष साजरे करा, पण...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

"पुणेकरांनी सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नव्या वर्षाचे आनंदात स्वागत करावे. स्वतः आनंद करताना इतरांच्या आनंदावर विरजण पडणार नाही, याची काळजी घ्यावी. नागरिकांना त्रास झाल्यास कडक कारवाई होईल. विशेषतः भरधाव वाहन चालविणारे आणि मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली जाईल.''

- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त, पुणे 

पुणे : पुणेकरांनी 31 डिसेंबरची रात्र व नवर्षाचे "सेलिब्रेशन' जोरात करावे. मात्र, नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाल्यास खपवून घेतला जाणार नाही. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी शनिवारी दिला. 31 डिसेंबरला पोलिस कर्मचाऱ्यांपासून ते पोलिस आयुक्तांपर्यंतचे सर्व अधिकारी बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार असून, दारु पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. 

पुणेकरांना गेल्या काही दिवसांपासून 31 डिसेंबरची रात्र आणि 2019 या नव्या वर्षाच्या स्वागताचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने नागरिकांकडून सेलिब्रेशनची जोरदार तयारीही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे "सेलिब्रेशन'च्या मुडमध्ये असणाऱ्या पुणेकरांना पोलिस आयुक्त डॉ.वेंकटेशम् यांनीही आनंद साजरा करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, काही अटीही घातल्या आहेत. 

मागील आठवड्यात मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई - - 500 

...असा असेल पोलिसांचा बंदोबस्त 

* पोलिस कर्मचारी व अधिकारी - 6 हजार 
* नाकाबंदीची ठिकाणे - 22 
* ब्रेथ ऍनलायझर - 240 
* ठिकठिकाणी होणार तपासणी 
* तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर होणार 
* व्हिजीबल पोलिसींगवर असणार भर 

पोलिसांची कारवाई टाळायची असेल तर हे करा

* आपले वाहन वेगात (रॅश ड्रायव्हिंग) चालवू नका 
* दारु पिऊन गाडी चालवू नका 
* ध्वनिक्षेपकासाठी पोलिसांची परवानगी घेणे अनिवार्य 
* गोंधळ करुन सार्वजनिक शांततेचा भंग करु नये 
* कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका

Web Title: Pune Police Prepared for Security of New Year Celebration