पुणे पोलिसांची सर्वात मोठी कारवाई: तब्बल 120 कोटी रुपयांचा गुटखा, तंबाखु माल जप्त 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून नोव्हेंबर महिन्यात शहराच्या वेगवेगळ्या 28 भागांमध्ये छापे टाकून गुटखाविरोधी जोरदार कारवाई केली होती. त्यानुसार, 17 नोव्हेंबरला चंदननगर पोलिस ठाण्यात सुरेश अग्रवाल, अक्षय सुरेश अग्रवाल, आकाश सुरेश अग्रवाल, प्रवीण मुकुंद वाहूळ, निरज मुकेश सिंगल यांच्याविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखु उत्पादने अधिनीयम, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनीयम या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडून साडे सात लाख रुपयांचा गुटखा व वाहने जप्त केली होती. त्यानंतर या व्यवसाया

पुणे : गुटखा विक्री व साठवणुकीस बंदी असतानाही महाराष्ट्रामध्ये गुटख्याचा पुरवठा करणाऱ्या कर्नाटकमधील एका गुटखा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांवरच पुणे पोलिसांनी थेट छापा घातला. या कारवाईमध्ये महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी आणला जाणारा तब्बल 120 कोटी रुपयांचा गुटखा व कच्चा माल सापडला. परराज्यात जाऊन इतक्‍या मोठ्या प्रमाणात छापे घालून कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना सापडल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले. 

गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून नोव्हेंबर महिन्यात शहराच्या वेगवेगळ्या 28 भागांमध्ये छापे टाकून गुटखाविरोधी जोरदार कारवाई केली होती. त्यानुसार, 17 नोव्हेंबरला चंदननगर पोलिस ठाण्यात सुरेश अग्रवाल, अक्षय सुरेश अग्रवाल, आकाश सुरेश अग्रवाल, प्रवीण मुकुंद वाहूळ, निरज मुकेश सिंगल यांच्याविरुद्ध सिगारेट व अन्य तंबाखु उत्पादने अधिनीयम, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनीयम या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडून साडे सात लाख रुपयांचा गुटखा व वाहने जप्त केली होती. त्यानंतर या व्यवसायासाठी हवाला मार्फत होणाऱ्या व्यवहाराची दखल घेऊन पाच हवालाद्वारे व्यवहार करुन देणाऱ्या ठिकाणांवर छापे टाकत चार कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली होती. त्याचवेळी चंदननगर येथील दाखल गुन्ह्यात 18 जणांना पोलिसांनी अटक केली. 

संबंधीत आरोपींकडे चौकशी केल्यानंतर अरुण तोलानी हा पुणे व महाराष्ट्रामध्ये बाहेरील राज्यातुन गुटखा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले होते. महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेल्या विमल गुटखा, व्हि-तंबाखु या स्वरुपाचा गुटखा हा कर्नाटक राज्यातील तुमकुर येथील व्हिएसपीएम प्रॉडक्‍टस्‌ व व्हि.एस.प्रॉडक्‍टस्‌ या कंपन्यांकडून उत्पादीत केला जात असल्याचे निष्पन्न झाले. संबंधीत कंपन्यांचा गुटखा महाराष्ट्रामध्ये अवैधरीत्या पुरवठा करण्याबरोबरच स्थानिक वितरकांपर्यंत पोचवित असल्याचेही निष्पन्न झाले. 

या पार्श्‍वभुमीवर 14 जानेवारीला गुन्हे शाखेच्या युनीट चारचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलिस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलिस कर्मचारी सचिन ढवळे, रमेश राठोड, कौस्तुभ जाधव यांचे पथक कर्नाटकमधील तुमकूर येथे रवाना झाले. या पथकाने गुटखा उत्पादन करणाऱ्या कंपन्या व त्यांच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्याबाबतची प्रत्यक्षात पाहणी करून माहिती गोळा केली. त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक संदिप जमदाडे व अन्य अधिकाऱ्यांचे एक पथक तयार करुन ते रजनीश निर्मल यांच्या मदतीसाठी पाठविण्यात आले.रजनीश निर्मल यांनी वेगवेगळी पथके तयार करून स्थानिक पोलिसांची मदत घेऊन 18 जानेवारीला कर्नाटकातील तुमकूर येथील अंतरसनाहल्ली औद्योगिक परिसरातील विमल गुटखा व व्हि-तंबाखु उत्पादन करुन साठवणूक करणाऱ्या व्हिएसपीएम प्रॉडक्‍टस्‌ व व्हि.एस.प्रॉडक्‍टस्‌ या कंपन्यांवर छापे घातले. पोलिसांनी 120 कोटी रुपयांचा गुटखा, त्यासाठी लागणारा कच्चा माल, सुपारी, सुगंधीत द्रव्ये, कात, चुना, मशीनरी, व्हिी तंबाखु व ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, त्यासाठीची तंबाखु, सुगंधीत द्रव्ये, मशीनरी सापडली. या मालाबाबतची माहिती पुणे पोलिसांनी कर्नाटकच्या अन्न व औषध प्रशासन विभागासह केंद्राच्या फुड सेफ्टी ऍन्ड स्टॅंडर्ड ऑथिरीटी ऑफ इंडिया यांना पत्राद्वारे कळविली. 

Image may contain: indoor, text that says "सकाळ AD"गुटख्याला महाराष्ट्रात बंदी, कर्नाटकमध्ये अधिकृत परवानगी 
महाराष्ट्रात गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ विक्री करण्यास कायद्याने मनाई आहे. मात्र कर्नाटकमध्ये पानमसाला व सुगंधीत तंबाखु विख्री अधिकृत परवानगी आहे. त्यामुळे कारवाईदरम्यान तांत्रिक अडचण निर्माण होण्याची शक्‍यता होती. मात्र परराज्यात गुटखा तयार करून तो महाराष्ट्रात सर्रासपणे विक्री केली जात असल्याच्या पार्श्‍वभुमीवर संबंधीत कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई 
गुटख्यामुळे कॅन्सरसारखा आजार होऊन नागरीकांचे मृत्यु होत असल्याने पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुटखाविरोधी कारवाईला बळ दिले. त्यानुसार, आत्तापर्यंत 27 ठिकाणी छापे टाकण्याबरोबरच थेट परराज्यातही कारवाई करण्यात आली. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनीट चारच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune police seized Gutka worth Rs 120 crore tobacco