#PunePollution श्‍वासच गुदमरतोय 

योगिराज प्रभुणे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

पुणे - पुणेकरांच्या प्रत्येक श्‍वासातून धूळ आणि नायट्रोजन डाय-ऑक्‍साईड (एनओएक्‍स) फुफ्फुसात जाण्याचे प्रमाण गेल्या 11 वर्षांपासून सतत वाढत आहे. पुण्यात 2007 मध्ये उत्तम असणारी हवेची गुणवत्ता वर्षागणिक ढासळत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या विश्‍लेषणावरून स्पष्ट झाले आहे. 

पुणे - पुणेकरांच्या प्रत्येक श्‍वासातून धूळ आणि नायट्रोजन डाय-ऑक्‍साईड (एनओएक्‍स) फुफ्फुसात जाण्याचे प्रमाण गेल्या 11 वर्षांपासून सतत वाढत आहे. पुण्यात 2007 मध्ये उत्तम असणारी हवेची गुणवत्ता वर्षागणिक ढासळत असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या विश्‍लेषणावरून स्पष्ट झाले आहे. 

आरोग्याच्या दृष्टीने "हेल्दी सीझन' समजल्या जाणाऱ्या हिवाळ्यात हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढते. हवेचा वेगही मंदावलेला असतो. धूलिकण, धूर आणि धुके हवेत मिसळले जाते. हिवाळ्यात हवा थंड असल्याने हवेचे अभिसरण थांबते. प्रदूषक जमिनीजवळ राहतात. त्यातून हिवाळ्यात प्रदूषण वाढते. या पार्श्‍वभूमीवर हिवाळ्याच्या सुरवातीलाच पुण्यातील हवेच्या गुणवत्तेचे विश्‍लेषण केले आहे. 

असे केले विश्‍लेषण 
पुण्यात "एमपीसीबी'ने 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान गेल्या 11 वर्षांमध्ये कर्वे रस्त्यावरील प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या आहेत. या 31 पैकी प्रदूषण नोंदविलेल्या दिवसांच्या माहितीचे विश्‍लेषण करण्यात आले. त्यात हवेत तरंगणाऱ्या सूक्ष्म धूलिकणांबरोबरच (आरएसपीएम) नायट्रोजन डाय-ऑक्‍साईडचा गेल्या 11 वर्षांमध्ये कसा बदल होत गेला, याच्या विश्‍लेषणातून ही माहिती पुढे आली आहे. 

धूलिकणाची पातळी धोकादायक 
हवेत 100 मायक्रॉनपर्यंत धूलिकण असल्यास हवेची गुणवत्ता चांगली मानली जाते. 2007 मध्ये 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर हे सर्व 31 दिवस हवा शुद्ध होती. त्यानंतरच्या 10 वर्षांमध्ये निरीक्षण नोंदवलेल्या सर्व दिवसांमध्ये हवेच्या चांगल्या गुणवत्तेची नोंद एकही दिवस झाली नाही. उलट, 2010 पासून प्रत्येकवर्षी हवेची गुणवत्ता खालावत गेल्याची माहिती पुढे आली आहे. 

फुफ्फुसांवर होतोय दुष्परिणाम 
पुण्यात 2007 मधील 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान 30 दिवसांमध्ये नायट्रोजन डाय-ऑक्‍साईडचे प्रमाण एकही दिवस धोक्‍याच्या पातळीपेक्षा वर नव्हते. म्हणजे ते 80 मायक्रॉनपेक्षा खाली नोंदले गेले. यंदा 19 दिवस हवेची गुणवत्ता मोजली गेली. त्यात सर्व दिवस या प्राणघातक वायूचे प्रमाण शहरात धोक्‍याच्या पातळीपेक्षा जास्त नोंदले गेले. 

सूक्ष्म धूलिकण म्हणजे काय? 
"पीएम 10' म्हणजे 10 मायक्रॉनपर्यंत आकार असलेले धूलिकण. एक मिलिमीटरचा एक हजारावा भाग म्हणजे एक मायक्रॉन. 

का वाढतात सूक्ष्म धूलिकण? 
शहरात विशेषत- शिवाजीनगर आणि स्वारगेट परिसरात गेल्या काही महिन्यांपासून विकास प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यात उड्डाण पुलाचे मोठे काम आहे. त्यामुळे हवेत सूक्ष्म धूलिकण वाढत असल्याचे निरीक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदविले आहे. 

हवेतील प्रदूषणाचा थेट परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होतो. थंडी सुरू झाली की, दम्याच्या रुग्णांची संख्या बेसुमार वेगाने वाढते. त्यात काही दम्याचा ऍटॅक इतका तीव्र असतो, की तो दोन- चार पावलेही चालू शकत नाही, त्यामुळे हवेतील धूळ आणि विषारी वायूंमुळे लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. 
- डॉ. जयंत नवरंगे, बालरोगतज्ज्ञ 

हवेतील प्रदूषणासह वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे अनेकांना श्‍वसनाचा त्रास होतो. अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असल्याने त्यातून धूलिकण इतरत्र पसरतात. त्याचा लहानांसह वयोवृद्धांना त्रास होतो. प्रदूषणाचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात झाडे लावण्याची गरज आहे. 
- गणेश शिंदे, कात्रज 

ठळक निरीक्षणे 
"एमपीसीबी'ने 11 वर्षांमधील 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यानच्या 325 दिवसांची हवेतील गुणवत्ता तपासली. त्यात 234 दिवस (72 टक्के) हवेत प्रचंड धूळ असल्याची माहिती पुढे आली आहे. याच दरम्यान हवेतील नायट्रोजन डाय-ऑक्‍साईडने 325 पैकी 106 दिवस (32 टक्के) धोक्‍याची पातळी ओलांडली होती. 

Web Title: pune pollution issue