पुण्यात रस्त्यावरील खड्ड्यांपासून मुक्ती शक्‍य (व्हिडिअो)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे - नैसर्गिक घटकांचा वापर करून खड्डे बुजविण्यासाठी नवीन तंत्र विकसित करण्यात पुण्यातील पृष्ठभाग विलेपनतज्ज्ञ राजेश राठोड यांना यश आले आहे. या तंत्राद्वारे दुरुस्ती केलेले रस्ते दीर्घकाळ टिकण्यास मदत होणार आहे; तसेच जवळपास 30 टक्‍के खर्चाची बचत होणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. 
 

पुणे - नैसर्गिक घटकांचा वापर करून खड्डे बुजविण्यासाठी नवीन तंत्र विकसित करण्यात पुण्यातील पृष्ठभाग विलेपनतज्ज्ञ राजेश राठोड यांना यश आले आहे. या तंत्राद्वारे दुरुस्ती केलेले रस्ते दीर्घकाळ टिकण्यास मदत होणार आहे; तसेच जवळपास 30 टक्‍के खर्चाची बचत होणार आहे, असा दावा त्यांनी केला आहे. 
 

खड्डे पडलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागते. रस्त्यांची वारंवार दुरुस्ती करूनही त्यांच्या स्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे चित्र असते. यावर मात करण्यासाठी राठोड यांनी नवीन तंत्र विकसित केले आहे. त्यांनी हे तंत्र दोन वर्षे संशोधन करून विकसित केले आहे. गूळ बनविण्याच्या प्रक्रियेत बाहेर पडणारा द्रवरूप उपपदार्थ "नॅप्थॅनेट', रोसिन डिंक आणि कॉंक्रीटचा वापर करून हे मिश्रण बनविण्यात आले आहे. सध्या खड्डेदुरुस्ती करताना वापरण्यात येणाऱ्या प्रक्रियेत पावसाच्या पाण्यामुळे खडी निघते, त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करूनही तो अल्पकाळासाठीच उपयोगी ठरतो. या तंत्राच्या आधारे दुरुस्ती करताना पाण्याच्या संपर्कातून कॉंक्रीट अधिक घट्ट होते, असा राठोड यांचा दावा आहे. 

याविषयी राठोड म्हणाले, ""नवे तंत्र सिमेंट कॉंक्रीट आणि डांबर अशा दोन्ही पद्धतीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी उपयोगी पडणार आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये खराब होणारे रस्ते या तंत्राद्वारे दुरुस्त करता येतील; तसेच याच्या आधारे रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कोणत्याही विशिष्ट सामग्रीची आवश्‍यकता नाही. याबाबतचा प्रयोग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर खेड शिवापूर येथे केला होता आणि तो यशस्वी झाला.'' 

नव्या पद्धतीत वापरण्यात येणारे घटक 
- गूळ बनविण्याच्या प्रक्रियेत बाहेर पडणारा उपपदार्थ "नॅप्थॅनेट' 
- रोसिन डिंक 
- कॉंक्रीटचे मिश्रण 

जुन्या पद्धतीत वापरण्यात येणारे घटक - 
- सिमेंट कॉंक्रीट 
- डांबर 

नव्या पद्धतीचे फायदे 
- नवीन पद्धतीनुसार 30 टक्के पैशांची बचत 
- पावसाळ्यात खड्डा पडण्याचा त्रास टळणार 
- खड्ड्यात पाणी साचलेले असतानाही दुरुस्ती 
- दुरुस्तीनंतर 90 मिनिटांत रस्ता वापरण्यायोग्य 
- दुरुस्तीसाठी कोणत्याही मोठ्या यंत्रांची आवश्‍यकता नाही 
- सिमेंट कॉंक्रीट, डांबर या दोन्ही पद्धतीच्या रस्त्यांची दुरुस्ती 

Web Title: Pune possible freedom from the potholes on the road