Pune : निकृष्ट काम लपविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची शक्कल.. असे रोवले खांब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : निकृष्ट काम लपविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची शक्कल.. असे रोवले खांब

निलेश बोरुडे

किरकटवाडी - खडकवासला धरण चौकापासून पुढे डोणजेकडे जाताना रस्त्याच्या कडेने बांधलेल्या गटाराचा स्लॅब त्यावर वाहन गेले की कोसळत असल्याने निकृष्ट काम लपविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने शक्कल लढवून वाहने जाऊ नयेत म्हणून गटाराच्या कडेने लोखंडी खांब रोवून घेतले आहेत.

परिणामी खडकवासला धरण चौकात अगोदरच अत्यंत अरुंद असलेला रस्ता आणखी सात फुटांनी कमी झाला असून सुट्टीच्या दिवशी वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या गटारावरील रस्ता केवळ पादचाऱ्यांसाठी आहे असे म्हणून सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहे.खडकवासला धरण चौकात नवीन ठेकेदाराने रस्त्याचे काम केल्यानंतर सुमारे पन्नास ते साठ मीटर सिमेंट कॉंक्रिटचे गटार बांधले आहे.

रस्त्याला समतल हे गटार बांधण्यात आल्याने त्यावरुन वाहने ये-जा करत होती. मात्र काही दिवसांतच दोन वेळा या गटारावरील स्लॅब कोसळून अपघात झाला. या गटाराचे काम अत्यंत निकृष्ट झाले असल्याचा आरोप नागरिक करत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र त्यावर कारवाई करण्याऐवजी गटाराच्या कडेने लोखंडी खांब रोवून घेतले.

परिणामी धरण चौकात अगोदरच अत्यंत अरुंद असलेला रस्ता आणखी सात फुटांनी कमी झाला असून त्याचा वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष........ कोल्हेवाडी येथे अगोदरच्या ठेकेदाराने याच पद्धतीने गटार बांधलेले आहे. त्यावरुन मोठमोठ्या ट्रक जातात परंतु कधीही स्लॅब खचलेला नाही.

तसेच त्याचा आकारही व्यवस्थित आहे. खडकवासला धरण चौकात मात्र कामाच्या गुणवत्तेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याने गटारावरील स्लॅब खचत असल्याचे दिसत आहे. बाह्यवळण रस्त्याकडे बांधलेल्या गटाराला अजिबात आकार नाही. रुंदी कमीजास्त झालेली असून कॉंक्रीटचा दर्जाही निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे.

" कामाचा वेग अत्यंत कमी असल्याने अगोदरच रहिवासी हैराण झाले आहेत. गावातील व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यातच जर कामाचा दर्जा असा असेल तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे." सौरभ मते, माजी सरपंच, खडकवासला.

"खडकवासला धरण चौकात अरुंद रस्ता असल्याने सुट्टीतीच्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी होते. त्यातच आता हे खांब रोवल्यामुळे रस्त्याची रुंदी आणखी कमी झाली आहे. परिणामी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक गावांतील नागरिक या वाहतूक कोंडीमुळे हैराण झाले आहेत. रस्त्याचे रुंदीकरण करण्याऐवजी रस्त्याची रुंदी कमी करणे योग्य नाही." शरद जावळकर, माजी सरपंच, खानापूर.

"खडकवासला चौकातील गटारावरील रस्ता हा केवळ पायी चालण्यासाठी असून वाहनांसाठी नाही. वाहने जाऊ नयेत म्हणून खांब लावण्यात आले आहेत."

आर.वाय. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.