#PuneRailway पार्सल मॅनेजमेंट सिस्टीमची प्रतीक्षाच

सम्राट कदम
सोमवार, 22 जुलै 2019

पार्सल मॅनेजमेंट सिस्टिम

  • ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम’ (क्रिस) या संस्थेद्वारे देशात ऑनलाइन पार्सल सेवा 
  • देशात प्रथम नोव्हेंबर २००६ मध्ये नवी दिल्ली ते हावडादरम्यान सुरवात
  • पार्सलचे वजन इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने होणार 
  • बारकोड तंत्रज्ञानाच्या वापराने पार्सलची माहिती ॲपच्या माध्यमातून समजणार 
  • राज्यात पहिल्यांदा मुंबई ते भुसावळ आणि नंतर मुंबई ते सोलापूर कार्यान्वित होणार 

पुणे - देशातील विविध शहरांमध्ये रेल्वेद्वारे पार्सल पाठविण्यासाठी ऑनलाइन प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. मात्र मध्य रेल्वेच्या पुणे विभाग त्यापासून वंचितच आहे. येथे दररोज दोन हजार पार्सलची वाहतूक होत असली, तरी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रेल्वेद्वारे पार्सल पाठविणे, आलेले पार्सल सोडवून घेणे अवघड होत आहे. त्यातून एजंटगिरी पोसली जात आहे. 

देशामध्ये दिल्ली-हावडा मार्गासह अन्य शहरांतील रेल्वे स्थानकांत पार्सल मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) वापरण्यात येते. परंतु पुण्यात त्याकडे दुर्लक्ष केले आहे. शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे प्रामुख्याने दुचाकींच्या वाहतुकीचे प्रमाण जास्त असते. तसेच भाजीपाला, मासे यांसारखा नाशवंत माल, कंपन्यांच्या वस्तू आदी सुमारे दोन हजार पार्सलची येथे रोज वाहतूक 

होते. परंतु पाठविलेले पार्सल कुठपर्यंत पोचले आणि ते कधी मिळेल, याची माहिती प्रवाशांना मिळत नाही. त्यामुळे त्यांना हेलपाटे मारावे लागतात. 
याबाबत मुख्य पार्सल अधिकारी राजेंद्र बोकाडे म्हणाले, ‘‘आमच्याकडे ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसल्याने सामान हस्तांतर आणि व्यवस्थापन करायला अडचण निर्माण होते. याचा त्रास प्रवाशांनाही होतो. आम्ही लवकरच ‘पीएमएस’ सुविधा सुरू करू.’’ 

फसवणुकीचे प्रकार...
पार्सल कार्यालयाबाहेर असलेल्या एजंटगिरीमुळे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. याबाबतचा वैभव शिंदे म्हणाले, ‘‘मला रेल्वेने कराईकलला दुचाकी पाठवायची होती. परंतु एजंटांनी केलेले पॅकिंगच अधिकारी स्वीकारतात. त्यासाठी मला ४५० रुपये अधिक द्यावे लागले.’’ याबद्दल बोकाडे म्हणाले, ‘‘साहित्याचे पॅकिंग करण्यासाठी खासगी लोक काम करतात. त्यासंबंधी अधिकृत निविदा काढून ही व्यवस्था पारदर्शक करणार आहे.’’

पार्सल विभागासाठी ‘पीएमएस’ कार्यान्वित करण्याचे काम ‘क्रिस’ ही संस्था करते. राज्यात दोन टप्प्यांत ही व्यवस्था लागू होणार आहे. या संबंधीचे सर्व अधिकार त्यांना आहेत. ते पुण्यात ‘पीएमएस’ कधी सुरू करतील, याची माहिती मिळालेली नाही.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Railway Parcel Management System Issue