पुणे रेल्वे स्थानकापासून रात्रीही बससेवा सुरू ठेवा    

pmp-night-bus-service
pmp-night-bus-service

पुणे - पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून सोडण्यात येत असलेल्या पीएमपीच्या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो, त्यामुळे ही बससेवा रात्रीही सुरू ठेवावी, असे रेल्वे प्रशासनाने पीएमपीला सुचविले आहे. तर, याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे पीएमपी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

पीएमपी प्रशासनाने १८ नोव्हेंबरपासून रेल्वे स्थानकाच्या आवारातून कात्रज, स्वारगेट, कोथरूड, आळंदी, तळेगाव, बावधन आदी मार्गांवर बस वाहतूक सुरू केली आहे, त्यामुळे रेल्वेतून उतरल्यावर प्रवाशांना लगेचच बस मिळत आहे. यापूर्वी प्रवाशांना बॅगा घेऊन स्थानक शोधत फिरावे लागत होते. आता रेल्वे स्थानकातूनच त्यांना बस उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे या बसला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रात्रीच्या सुमारास लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वे गाड्या शहरात येतात, त्यांत प्रवाशांची संख्या मोठी असते, त्यामुळे ही बससेवा रात्रीही सुरू ठेवावी, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक मिलिंद देऊस्कर यांनी पीएमपीच्या अध्यक्ष नयना गुंडे यांना सुचविले आहे. 

दरम्यान, रेल्वे स्थानकातून बस सोडण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याबद्दल वाहतूक पोलिसांनीही रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहे. या निर्णयामुळे स्थानकाच्या परिसरातील वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे, असे त्यांनी एका पत्राद्वारे रेल्वे प्रशासनाला कळविले आहे.

रेल्वे स्थानकातून बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे आम्ही बसची संख्या वाढविली आहे. आता रात्रीही बससेवा सुरू ठेवण्याबाबत नियोजन करण्यात येईल. लवकरच याचा निर्णय जाहीर करू.
- अजय चारठणकर, सहव्यवस्थापकीय संचालक,  पीएमपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com