Pune Rain: आंबिल ओढ्याकाठी मलमपट्टी; रहिवासी मात्र भितीच्या छायेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

पावसाचा जोर कायम राहिल्याने या भागात पुन्हा पूरस्थिती ओढविण्याची भीती आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

पुणे - पाऊस पाठ सोडत नसल्याने सुरक्षिततेचा भक्कम उपाय करून रहिवाशांना दिलासा देण्याऐवजी महापालिकेने आंबिल ओढ्यात केवळ भराव टाकला आहे. भरावाच्या ढिगाऱ्यामुळे लोकवस्तीत पुराचे पाणी शिरणार नसल्याचा दावा महापालिका करीत आहे, मात्र भराव ओढ्यात वाहून जात असल्याचे चित्र आहे. तसेच ओढ्यातील राडारोडाही उचलण्यात आला नाही. परिणामी, पावसाचा जोर वाढल्यास पाणी तुंबण्याचा धोका कायम आहे. 

पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर येऊन दांडेकर पुलाशेजारील काही घरे वाहून गेली. तर आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले. ओढ्यालगतची भिंतही कोसळली. तेथील राडारोडा, कचऱ्याचे ढीग यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने या भागात पुन्हा पूरस्थिती ओढविण्याची भीती आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. ज्यामुळे पूर येणार नाही. मात्र पूरस्थिती ओसरल्यानंतर जेमतेम दोन-अडीच दिवस जेसीबीच्या माध्यातून साफसफाई करण्यात आली. त्यानंतरही ओढ्याचे पाणी घरात शिरण्याची शक्‍यता असल्याने कोसळलेल्या भिंतीच्या जागी भराव टाकण्यात आला आहे. मात्र हा उपाय सुरक्षित नसल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून दिसून आले आहे. पुरात अनेकांचे जीव गेल्यानंतरही महापालिका प्रशासन मात्र वरवरची मलमपट्टी करीत असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. 

पुराचे पाणी लोकवस्तीत येऊ नये, यासाठी भराव टाकला आहे. तो ओढ्याच्या पात्रापासून लांब आहे. त्यामुळे भराव ओढ्यात वाहून जाणार नाही. भिंत नव्याने बांधण्यात येईल. त्यामुळे हा भाग अधिक सुरक्षित होईल. 
-माधव देशपांडे, उपायुक्त, महापालिका 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune rain Ambil Odha