Pune Rain : ...तेव्हा नागरिकांची धावपळ झाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पुरंदर तालुक्‍यातील नाझरे धरण सन 1974 मध्ये बांधल्यानंतर गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदाच धरणातून 80 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्याची वेळ आली.

बारामती (पुणे): पुरंदर तालुक्‍यातील नाझरे धरण सन 1974 मध्ये बांधल्यानंतर गेल्या 45 वर्षांत पहिल्यांदाच धरणातून 80 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्याची वेळ आली.

नाझरे धरणाची उंची बावीस मीटरपर्यंत असून, 788 दशलक्ष घनफूट एवढी पाणीक्षमता आहे. धरणाचे सर्वच्या सर्व 26 दरवाजे सोडले, तरी त्याची कमाल विसर्गाची क्षमता 85 हजार क्‍युसेक एवढी असते. त्यावरून आज विसर्ग केलेल्या या पाण्याच्या वेगाचा अंदाज येतो. आज पहाटे पावणेदोनच्या सुमारास या धरणातून 70 हजार क्‍युसेक, त्यानंतर सव्वादोनच्या सुमारास 80 हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. मात्र, स्थानिक नागरिकांच्या मते, सन 2008 च्या तुलनेत आता पाण्याने दिलेला वेढा मात्र तुलनेने थोडा कमी दिसत होता.

धरणातून सोडलेले पाणी मोरगाव येथे कऱ्हा नदीमध्ये पोचण्यास पहाटेचे पाच वाजले. त्यानंतर हळूहळू नदीवरील सर्व बंधाऱ्यांमध्ये पाण्याची पातळी वाढत गेली. सकाळी साडेसातपर्यंत जळगाव कडेपठार, अंजनगाव आदी भागातील रस्त्यावरही पाणी घुसले. त्यानंतर मात्र स्थानिक नागरिकांना या पाण्याच्या वेगाचा व पुराचा अंदाज आला. मात्र, रात्रीपासून प्रशासनाकडून दौंडी व माहिती दिली जात होती. मात्र, जेव्हा पाणी रस्त्यावर येऊ लागले, तेव्हा नागरिकांची धावपळ झाली. कित्येक वर्षानंतर आलेल्या पाण्याचा वेग पाहण्यासाठी कऱ्हावागज, अंजनगाव, काऱ्हाटी, जळगाव कडेपठार, फोंडवाडा आदी भागातील नागरिक मंदिराच्या ठिकाणी व नदीच्या कडेच्या वरच्या भागात व रस्त्यावर थांबून होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune rain nazare dam first time overflow at purandar