Pune Rain Updates : मुसळधार पावासाने पुण्याला झोडपलेे! 'अशी' आहे आजची स्थिती

टीम ई-सकाळ
Thursday, 15 October 2020

विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसानं काल पुणे शहरात धुमाकूळ घातला. शहरात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं. आज सकाळपासून पावसाची उघडीप आहे.

पुणे :  शहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागातील सोसायटया, घरे व पार्किंगच्या ठिकाणी पाणी शिरण्याच्या तब्बल 40 पेक्षा जास्त घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी अग्निशामक दलाच्या जवानानी तत्काळ पोचुन पाणी काढण्याचे काम गुरुवारी पहाटेपर्यंत सुरु ठेवले होते. याबरोबरच 5 ते 10 ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या.

शहरात बुधवारी सायंकाळी शहरात पावसाळा सुरुवात झाली. त्यानंतर रात्री पावसाचे प्रमाण वाढले. मोठ्या प्रमाणात पाऊस सुरु झाल्याने रस्ते पाण्याने भरुन वाहु लागले. पावसाचे पाणी वाहुन जाण्यासाठी आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था नसल्याने पाणी सोसायटयाचे तळघर, घरे व पार्किंगमध्ये शिरले. त्यामध्ये नागरीकांच्या गाड्या पाण्यात गेल्या.

येरवडा विश्रांतवाडी, लोहगावला फटका
रात्री पाऊस वाढल्याने येरवडा, विश्रांतवाडी, लोहगाव या भागातील  सोसायटया, घरे व पार्किंगच्या ठिकाणी पाणी शिरण्याच्या जास्त घटना घडल्या. शास्त्रीनगर, पोरवाल रोड, चंदननगर, विश्रांतवाडी येथे पाणी शिरले. त्यामुळे नागरीक मोठ्या प्रमाणात चिंतेत होते. दरम्यान, येरवडा, नायडु, हडपसर अग्निशामक दलाच्या गाड्यानी घटनास्थली जाऊन पाणी काढण्याचा प्रयत्न केला.

 

चंदननगर पोलिस ठाण्यात पाणी
चंदन नगर पोलिस ठाण्यालाही पावसाचया पाण्याचा फटका बसला. संपूर्ण पोलिस ठाण्यात पाणी शिरल्याने पोलिसांचाही गोंधळ उड़ाला.पोलिसांची वाहनेही पावसाच्या पाण्यात बुडाली.

  परीक्षा पुढे ढकलल्या
  विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसानं काल पुणे शहरात धुमाकूळ घातला. शहरात अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं. आज सकाळपासून पावसाची उघडीप आहे. परंतु, घरात शिरलेले पाणी आणि त्या पाण्यासोबत आलेला चिखल काढण्यात अनेकांची सकाळ खर्ची पडली आहे. पाणी शिरलेल्या वस्त्त्यांमध्ये दुर्गंधी पसरली आहे. दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पावसामुळे ऑनलाईन परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. 

  कात्रज तलाव पूर्ण क्षमतेने भरला
  कात्रज तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून बुधवारी रात्री उशिरापर्यंत पडलेल्या पावसाने तलावाच्या सांडव्यावरून या वर्षी प्रथमच पाणी वाहत आहे त्यामुळे तलावाचे सौंदर्य अजूनच खुलले आहे. तलावात जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून इतर वेळीस तलावावर जलपर्णीचा गालिचा असतो, बुधवारच्या पावसाने जलपर्णी मोठ्या प्रमाणात आंबिल ओढ्यात वाहून आली आहे.

  • बाणेर येथील मुळा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बाणेर स्मशानभूमीच्या पायऱ्यांना पाणी लागले आहे.
  • ज्ञानगंगा सोसायटी सिंहगड इन्स्टिट्युट पायथा वडगाव बु. येथे दोन भिंती पडल्या असून परिसरात पाणीच पाणी झाले
  • सनसिटीतून प्रयेजा सिटीकडे जाणारा रस्ता पुन्हा वाहून गेला आहे. तसेच गेल्यावर्षी बांधण्यात आलेला पूल पुन्हा वाहून गेला आहे. फनटाइमकडून प्रयेजा सिटीकडे येणारा रस्ता देखील वाहून गेला आहे. त्यामुळे मधल्या भागात असणारे नागरिक अडकले आहेत. 
  • महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कोंढवे- धावडे येथील पाणी योजनेतील श्री कोंढवेश्वर मंदिराजवळील ओढ्यातील जलवाहिनी वाहून गेली. परिणामी येथील कोंढवे धावडे येथील खडकवस्ती भागाला आज उद्या पाणी पुरवठा होणार नाही : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
  • घोरपडीमधील फैलावाली चाळ आणि परिसरात दुपारी दोन वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले. रेल्वे, मनपा आणि कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या विसंवाद यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच घोरपडीतील आर्मी बंगल्यात मोठ्या प्रमाणावर रात्रीपासून पाणी साचले आहे.
  • कोथरूड मध्ये अनेक भागात पाणी शिरले. काही ठिकाणी सीमा भिंतीपडून नुकसान झाले .  पावसाचे पाणी दुचाकीत शिरल्याने गाड्या बंद  पडण्याच्या घटना घडल्या.म्हातोबादरा,  सुतारदरा, सागर कॉलनी,  लालबहादुर शास्त्री कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, शिवांजली मित्र मंडळ,  यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परीसर येथील नाल्यालगत असलेल्या घरांमध्ये पाणी  शिरून मोठे  नुकसान
  • आंबिल ओढ्याच्या कडेला असलेल्या टांगेवाला कॉलनी, संतनगर अण्णा भाऊ साठे वसाहत, शिव दर्शन, तावरे कॉलनी,शाहू वसाहत, लक्ष्मीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरून अनेकांचे नुकसान झाले आहे. पाऊस आला की येथील नागरिकांना रस्त्यावर येऊन सहारा घ्यावा लागत आहे.
  • किरकटवाडी खडकवासला येथे बुधवारी अतिवृष्टी झाली. पावसाने ओढ्याला आलेल्या महापूराने नुकसान झाले
  • औंध, बोपोडी, सकाळ नगर, पंचवटी, पाषाण, सोमेश्वरवाडी, सूसरस्ता, सुतारवाडी, महाळुंगे परिसरात नागरीकांची तारांबळ उडाली. रात्री ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे राम नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता.
  • पाषाण येथील बालाजी चौका जवळील मॉंटव्हर्ट सोसायटी शेजारील जवळपास तीस घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली.
  • सकाळ नगरमधील बाणेर रेसिडेन्सी या इमारतीत चेंबर तुंबल्याने पाणी शिरल्याने रहिवाशांनी अनुभवली.
  • बाणेर बालेवाडी परिसरास  बुधवारी रात्री  मुसळधार पावसाने  चांगलेच झोडपून काढले. या पावसामुळे या भागातील काही सोसायट्यांच्या  वाहन तळ्यांमध्ये पाणी घुसले.
  • बाणेर बालेवाडी परिसरातून वाहणार्‍या मुळा नदीचे पाणी पातळी बरीच वाढली, बाणेर येथील राम  नदीच्या पाण्यातही वाढ झाली आहे. 

  महापालिकेची हेल्पलाईन

  • महापालिका आपत्ती व्यवस्थापन
  • ०२०२५५०६८००
  • ०२०२५५०६८०१
  • ०२०२५५०६८०२
  • ०२०२५५०६८०३
  • ०२०२५५०६८०४
  • पोलिस : १००
  • अग्निशमन : १०१
  • रुग्णवाहिका : १०८

  आणखी बातम्या 
  मुसळधार पावसाने उडवली पुणेकरांची झोप; वाचा काल रात्री काय घडलं?
  व्हिडिओ:दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरून वाहिले पाण्याचे लोंढे
  पुण्यात पावसाचे थैमान, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: pune rain update 15 october