पुण्याला वर्षभर पुरणारे पाणी सोडले आठवडाभरात

ज्ञानेश्‍वर बिजले
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे, सर्व धरणांच्या क्षेत्रात पडलेल्या पावसाचे पाणी थेट नदीपात्रात सोडून द्यावे लागत आहेत. आज सकाळपासून 27 हजार 203 घनफूट प्रति सेकंद (क्‍युसेक) पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे प्रमाण कमी झाले आहे.

पुणे : पुणे शहराला जवळपास वर्षभर पुरेल, एवढे पाणी खडकवासला धरणातून गेल्या आठवडाभरात मुठा नदीत सोडण्यात आले. खडकवासल्यातून आत्तापर्यंत 14 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी नदीत सोडण्यात आले आहे.

खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे, सर्व धरणांच्या क्षेत्रात पडलेल्या पावसाचे पाणी थेट नदीपात्रात सोडून द्यावे लागत आहेत. आज सकाळपासून 27 हजार 203 घनफूट प्रति सेकंद (क्‍युसेक) पाणी मुठा नदीत सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर ओसरल्यामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे प्रमाण कमी झाले आहे.

पुणे जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता संजीव चोपडे म्हणाले, "यंदा खडकवासल्यातून 45 हजार पाचशे क्‍युसेक पाणी सोडले, ती महत्तम पातळी होती. आता साडेसत्तावीस हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. बंडगार्डन येथे मुळा, मुळशी व पवना नदीतील पाणी एकत्र येते. तेथील पाणी पातळी सव्वा लाख क्‍युसेकपर्यंत पोहोचली होती. पवना व मुळशी धरणातून पाणी सोडण्याचे काल थांबविले होते. पाऊसही कमी झाल्यामुळे, बंडगार्डन येथील पाणीपातळी आज 31 हजार क्‍युसेकपर्यंत कमी झाली आहे. धरणांत थोडी जागा शिल्लक ठेवण्याच्या उद्देशाने पवना व मुळशी धरणातून आज पुन्हा पाच हजार क्‍युसेकचा विसर्ग सोडण्यास सुरवात केली.''

"पुणे शहराने गेल्या वर्षी पिण्यासाठी 18 टीएमसी पाणी घेतले. पूर्वी ते 15 ते 16 टीएमसी पाणी घेत होते. खडकवासला धरणातून आजपर्यंत 14 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले,'' अशी माहिती त्यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune rain water released from Khadakwasla dam to Mutha river