#PuneRains पुरात दोनशे कोटींची हानी

Loss
Loss

आंबिल ओढ्याच्या पुरामुळे तब्बल दोनशे कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने काढला आहे. सुमारे सहाशे घरांना पुराचा फटका बसला असून, अनेकांचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कशी होणार, या चिंतेत पूरग्रस्त आहेत.

गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे आंबिल ओढ्याला पूर आला. या पुराने ओढ्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या सोसायट्या, बंगले, झोपडपट्टी आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले. सोसायट्या आणि बंगल्यांच्या सीमाभिंती पडल्या. हजारो वाहने वाहून गेली. याशिवाय घरातील टीव्ही, फ्रिज, कपडे, फर्निचरसह अनेक वस्तूंचे नुकसान झाले. ट्रेझर पार्क, लेकटाऊन, गुरुराज यांसारख्या मोठ्या सोसायट्यांमधील पार्किंग पाण्याखाली गेले. त्यातून कोट्यवधी रुपये किमतीच्या गाड्यांचे नुकसान झाले. नुकसान झालेल्या दुचाकी गाड्यांची संख्याही मोठी आहे. जवळपास पंधरा जणांना आपला जीव गमवावा लागला.

महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे सहाशे घरांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत केवळ २८२ घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित बाधितांचे पंचनामे कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे पूर्ण होऊ शकत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बांधित कुटुंबीयांना केवळ पंधरा हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. प्रत्यक्षात झालेले नुकसान पाहता ही भरपाई अत्यंत तोकडी असल्याचे प्रशासनदेखील कबूल करते. परंतु, शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसारच पंचनामे करावे लागत आहेत, असे कारणही प्रशासनाकडून सांगण्यात आले. शासनाकडून देण्यात येणाऱ्या भरपाईचा आकडा आणि प्रत्यक्षात झालेले नुकसान, यामध्ये मोठी तफावत आहे. चारचाकी, दुचाकी, फर्निचर, टीव्ही यांच्यासह घरातील अन्य वस्तूंचे झालेले नुकसान विचारात घेतल्यास प्राथमिक आकडा दोनशे कोटी रुपयांपर्यंत जातो, असेही अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्याने तीसहून अधिक चारचाकी आणि चाळीस दुचाकी पूर्णपणे स्क्रॅप झाल्या. अद्यापही पंचनामे झालेले नाहीत. आता थोडा पाऊस झाला, तरीदेखील पार्किंगमध्ये पाणी येते. सांडपाणी वाहून जाणाऱ्या सर्व वाहिन्या गाळाने भरल्या आहेत. तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही.
- गणेश पवार, सोबासांज सोसायटी, बिबवेवाडी

आमच्या सोसायटीत ३५२ फ्लॅट आहेत. पार्किंग आणि पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले होते. या पुरात जवळपास ४०० चारचाकी गाड्या आणि ३५० दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले. पाणी ओसरल्यानंतर साफसफाई आणि गाळ काढण्यासाठी सोसायटीला चाळीस लाखांहून अधिक खर्च झाला. झालेले नुकसान कोण भरून देणार?
- विजय शिंदे, ट्रेझर पार्क संघर्ष समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com