#PuneRains : चार हजार घरांचे पंचनामे पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

आंबेडकर वसाहतीमध्ये कार्यवाही झालीच नाही 
पर्वती - पर्वतीदर्शन येथील आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे चाळ क्रमांक १०८, १०६, १०५, १०७ आणि आंबेडकर वसाहतीमधील अनेक घरे वाहून गेली. त्यात जीवनावश्‍यक वस्तू वाहून गेल्या. पण, नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी कोणीही आलेले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये काळजीचे वातावरण आहे. पुराच्या पाण्यामुळे नागरिकांची कागदपत्रे वाहून गेलेली आहेत. ती आम्हाला परत काढून भेटावीत. लवकरात लवकर शासनाने आमच्या या परिस्थितीची दखल घेऊन पंचनामे करावेत आणि मदत मिळावी, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.

पुणे - मुसळधार पावसाने हजारो नागरिकांचे संसार वाहून गेले. त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पंचनामे करण्यास सुरवात केली असून, रविवारपर्यंत चार हजार घरांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. आणखीही काही वस्त्या व शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम शिल्लक आहे. 

बुधवारी (ता.२५) रात्री पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याच्या परिसरातील रहिवाशांना फटका बसला. घरातील कपडे, अंथरूण- पांघरूण, अन्नधान्य, भांडी याचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने गुरुवारपासून पंचनामे सुरू केले. टांगेवाला कॉलनीतील मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रुपयांचा मदतीचा धनादेशही देण्यात आला. 

आंबिल ओढ्याच्या शेजारी असलेल्या इंदिरानगर, बिबवेवाडी, केके मार्केट, मोरे वसाहत, टांगेवाला कॉलनी, अण्णा भाऊ साठेनगर, साने गुरुजी वसाहत, दांडेकर पूल सर्व्हे क्रमांक १३३ व १३० येथील ३ हजार कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. यामध्ये अण्णा भाऊ साठे वसाहत, राजेंद्रनगर, टांगेवाला कॉलनी येथे घरांचे नुकसान झाले आहे. घरातील कपडे, धान्याचे नुकसान झाले त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळेल, असे तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी सांगितले. 

शेतीचे पंचनामे अद्याप प्रलंबित 
हवेली तहसीलअंतर्गत येणाऱ्या कात्रज, धनकवडी, वडगाव, किरकिटवाडी, खडकवासला, थेऊर, उरळी कांचन येथील १ हजार १०० घरांचे पंचनामे झाले आहेत. यामध्ये बहुतांश झोपडपट्टीचा भाग आहे. खडकवासला परिसरात शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे; पण तेथीलही पंचनामे लवकर केले जातील. यासाठी महापालिकेकडून मनुष्यबळ मिळणार आहे, असे तहसीलदार सुनील कोळी यांनी सांगितले. 

नुकसानभरपाईचे काय? 
पुराचे पाणी घुसून सोसायट्यांच्या तळमजल्यावरील फ्लॅट व बंगल्यांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून झोपडपट्टीतील पंचनाम्यांवर भर दिला जात आहे. सोसायट्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे पुरबाधितांचे आहे. गुरुराज सोसायटीसह अनेक सोसायट्या, बंगल्यात कपडे, धान्य याचे नुकसान होऊनही त्यांचे पंचनामे झालेले नाहीत. हे पंचनामे लवकर करू, असे अधिकारी सांगत आहेत. 

पंचनामे झालेल्यांना १५ हजार 
ज्या घरात पाणी घुसून कपडे व धान्य याचे नुकसान झाले त्यांना घरखर्चासाठी १५ हजार रुपयांची मदत मिळणार आहे, तर ज्यांचे घर पडले आहे, त्यांना एका वर्षाचे घरभाडे म्हणून ३६ हजार रुपये आणि 
वाळू व मुरूम यासाठी रोख मदत मिळणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains 4000 Home Investigation Complete Administrative