Pune Rains : बारामतीतील अनेक भाग पाण्याखाली...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नाझरे जलाशयातून कऱ्हा नदीत 85 हजार क्‍युसेक पाणी सोडल्याने आज (गुरुवार) बारामती शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले.

बारामती (पुणे): नाझरे जलाशयातून कऱ्हा नदीत 85 हजार क्‍युसेक पाणी सोडल्याने आज (गुरुवार) बारामती शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. खंडोबानगर, पतंगशानगर, अप्पासाहेब पवार मार्ग, दातेंचे गणेश मंदिर यांसह नदीच्या कडेला असलेल्या सखल भागात पाणी वेगाने घुसले. शहरातील कसबा, खंडोबानगर तसेच रिंग रोडवरील पुलाच्या अगदी जवळ पाण्याची पातळी आली होती.

शहरातील स्मशानभूमी पूर्णपणे पाण्याखाली गेल्या होत्या. कऱ्हा नदीत 85 हजार क्‍युसेक पाणी सोडणार असल्याची कल्पना जलसंपदा विभागाने बारामतीतील प्रशासनास रात्रीच दिली होती. नगरपालिका, महसूल व पोलिस यंत्रणेने रात्रभरात धावपळ करत लोकांना घराबाहेर काढत शाळा, मंगल कार्यालयांमध्ये त्यांचे स्थलांतर केले. जवळपास पाचशेहून अधिक कुटुंबांचे प्रशासनाने स्थलांतर केले.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, गटविकास अधिकारी प्रमोद कांबळे, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील, जलसंपदा विभागाचे अजित जमदाडे, यांच्यासह नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, सूरज सातव, अमर धुमाळ, गणेश सोनवणे, सुधीर पानसरे, अभिजीत जाधव, बिरजू मांढरे, सुनील सस्ते, सुहासिनी सातव यांच्यासह अनेक स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व नगरपालिकेचे कर्मचारी स्थलांतरासाठी मदत करत होते.
शाळा, मंगल कार्यालयांसह जेथे जागा असेल तेथे स्थलांतरासह चहा, नाश्‍ता व जेवणाची व्यवस्था करण्यात येत होती.

दरम्यान, आज सकाळी दहा नंतर पाण्याचा वेग वाढला आणि पाहता पाहता सर्व स्मशानभूमी तसेच नदीच्या कडेचा परिसर जलमय झाला. खंडोबानगर भागाला या पुराचा सर्वाधिक फटका बसला. नदीकडेला राहणाऱ्या लोकांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने लोकांच्या सामानाचे मोठे नुकसान झाले.

जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांची भेट
अप्पासाहेब पवार मार्गावरील नदीपात्रालगतची भिंत कोसळली तसेच खंडोबानगरमधील एक घर पुराच्या पाण्याने कोसळले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुराच्या पाण्याने नदीशेजारील पिकांचे अतोनात नुकसान झाले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बारामतीला भेट देत परिस्थितीची माहिती घेतली. पिकांचे पंचनामे केले जातील, असे सांगितले. अप्पासाहेब पवार मार्ग, दातेंचे गणेश मंदिर, राजेंद्र बनकर यांच्या घरासमोरील रिंग रोड पुराच्या पाण्याखाली गेला होता. पुराचे पाणी पाहण्यासाठी झालेली बघ्यांची गर्दी आवरताना पोलिसांना कसरत करावी लागली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune rains baramati city area under water