Pune Rains : आता झुंज चिखल, गाळाशी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

 अस्मानी थैमानानंतर ओढ्यानाल्यांचे पाणी ओसरले असले, तरी घराघरांत साचलेला चिखल काढून पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान आहे मांगडेवाडीपासून नवी पेठेपर्यंतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये. या भागात पाणी आणि वीजही नाही. रस्तेही वाहून गेले आहेत. महापालिकेची यंत्रणा कामाला लागली असून, जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे.

पुणे -  अस्मानी थैमानानंतर ओढ्यानाल्यांचे पाणी ओसरले असले, तरी घराघरांत साचलेला चिखल काढून पुन्हा संसार उभा करण्याचे आव्हान आहे मांगडेवाडीपासून नवी पेठेपर्यंतच्या वस्त्या आणि सोसायट्यांमध्ये. या भागात पाणी आणि वीजही नाही. रस्तेही वाहून गेले आहेत. महापालिकेची यंत्रणा कामाला लागली असून, जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे.

बुधवारी रात्री झालेल्या पावसाने शहरात हाहाकार माजवला. आंबिल ओढ्याच्या दुतर्फा असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. दक्षिण पुण्यातील पाच लाखांहून अधिक नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसला. विजेचा खेळखंडोबा, विस्कळित पाणीपुरवठा आणि घरादारांत चिखल यामुळे नागरिकांचे हाल झाले. शुक्रवारीही अनेक भागांत ही स्थिती होती. घरांतील पाणी निघून गेले; पण चिखल आणि गाळ होता. त्यातच संसारोपयोगी वस्तू इतस्ततः पडल्या होत्या. 

महापालिका प्रशासन शुक्रवारी कामाला लागल्याचे अरण्येश्‍वर, टांगेवाला कॉलनी, पर्वती दर्शन, तावरे कॉलनी, शिवदर्शन, कात्रज, धनकवडी, अप्पर इंदिरानगर, दांडेकर पूल, नवी पेठ आदी भागांत दिसून आले. भिजलेल्या वस्तू नागरिकांनी उन्हात वाळायला टाकल्या होत्या; तर भिजलेले अंथरण-पांघरूण, गाद्या अनेकांनी फेकून दिल्या. इंदिरानगर येथील वस्तीमध्ये ड्रेनेजची व्यवस्था कोलमडून पडली होती. पूरग्रस्तांना काही स्वयंसेवी संस्थांनी मदतीचा हात पुढे केल्याने जेवण व नाश्‍ता मिळत होता; पण खराब झालेल्या संसारोपयोगी साहित्याचे काय, असा प्रश्‍न त्यांच्या पुढे होता. इंदिरानगर, अरण्येश्‍वर, अप्पर आदी भागात टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा महापालिकेने पुरवठा सुरू केला आहे; तसेच लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भेट दिल्यावर रहिवासी संतप्त भावना व्यक्त करीत असल्याचे दिसून आले. 

पद्मावती येथील गुरुराज सोसायटीमधील तळमजल्यावरील सुमारे ५० फ्लॅटमध्ये अजूनही चिखल आहे; तर के. के. मार्केटमध्ये व परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर गाळ साचल्याने तेथे दुर्गंधी पसरली होती. येथे महापालिकेच्या यंत्रणेसह स्थानिक नागरिकांनीही पुढाकार घेऊन स्वच्छता सुरू केली आहे.

वाहनांसाठी टोइंग 
वाहनांची चाके, इंजिनमध्ये गवत, झाडाच्या फांद्या, प्लॅस्टिक, दगड असा कचरा जाऊन बसला आहे. त्यामुळे गाड्या बंद पडल्या आहेत. ही वाहने टोइंग करून गॅरेजला नेण्यासाठी रहिवाशांची धडपड सुरू होती. अनेक गॅरेज व्यावसायिक सोसायट्यांपर्यंत पोचल्याचे दिसून आले. 

नातेवाइकांकडे मुक्काम 
पाणी व चिखलामुळे अनेकांनी मुले, ज्येष्ठ नागरिकांना नातेवाइकांच्या घरी मुक्कामासाठी पाठविले आहे. रहिवासी रविप्रकाश साठे म्हणाले, ‘‘दोन दिवसांपासून हडपसरला नातेवाइकांकडे राहत होतो. आता परत येऊन घरात स्वच्छतेस सुरवात केली आहे.’’ 

स्वच्छतेसाठी दोन हजार कर्मचारी नेमले आहेत. सोसायट्यांमधील राडारोडा, नाल्यातील वाहने बाहेर काढण्यासाठी व कचरा वाहतुकीसाठी १७७ वाहने आहेत. या भागात लवकरात लवकर स्वच्छता करून तेथे रोगराई पसरू नये, यासाठी औषधफवारणी केली जात आहे. 
-सौरभ राव, महापालिका आयुक्त

महापालिकेची यंत्रणा आज मदतीसाठी आली आहे. दोन दिवसांपासून वीज व पाणी नसल्याने आम्ही नातेवाइकांकडे राहण्यासाठी गेलो आहोत. यापूर्वी अशी स्थिती कधीही निर्माण झाली नव्हती.
-श्रीराम जोशी, पूरबाधित  

ओढ्याची संरक्षक भिंत कमकुवत आहे. त्या पुन्हा बांधताना दर्जेदार बांधल्या पाहिजेत. महापालिकेच्या डोळ्यांपुढे अतिक्रमण होत असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही स्थिती ओढावली आहे.
-सुनीता पेंडसे, पूरबाधित


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains The Challenge of Removing Stored Mud