Pune Rains : ‘पुण्याचे पालकमंत्री व खासदारांवर सदोष मुनष्य वधाचा गुन्हा दाखल करा’

टीम ई-सकाळ
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

पुणे शहरात ५४ हून अधिक निष्पाप पुणेकरांचे बळी गेले आहेत. या निष्पाप बळींना जबाबदार असणारे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार गिरीष बापट यांना जबाबदार धरून त्यांच्या विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.

पुणे : यंदाच्या पावसाळ्यात केवळ साडे तीन महिन्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पुणे शहरात ५४ हून अधिक निष्पाप पुणेकरांचे बळी गेले आहेत. या निष्पाप बळींना जबाबदार असणारे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार गिरीष बापट यांना जबाबदार धरून त्यांच्या विरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहन जोशी यांनी आज गुरूवार रोजी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

शिवाजीराव भोसले बँकेचे संचालक मंडळ बरखास्त

तुफान पावसामुळे सिंहगड रस्ता, धनकवडी, बिबवेवाडी व अन्य परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. एस. पी. कॉलेजजवळ एका पीएमटी बस चालकास आपला प्राण गमवावा लागला. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. रोज गुडघाभर पाणी साचते. वाहतुकी कोंडी होते. नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. काम सोडून घरी रहावे लागत आहे. परंतु, याचे गांभीर्य प्रशासन व सत्ताधारी भाजपच्या नेत्यांना राहिलेले नाही. पानशेत धरण फुटल्याच्या घटनेनंतर गेल्या साडेतीन महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे एकाच मोसमात येवढ्या मोठ्या प्रमाणात बळी जाण्याची घटना यावर्षी घडली आहे. पुणे महानगरपालिकेच्या अंदाज पत्रकात नाला सफाई व पावसाळी गटारे साफ करण्याच्या कामासाठी १३० कोटी रूपये खर्च केले. परंतु, पावसाने या सर्वांचा ढिसाळ कारभार उघडकीस आणला आहे. या सर्वांनीच काम केले नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या सर्व कामांच्या बाबतीत निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा सिध्द झाला असल्याचे दिसते. यामुळे पुणे शहराचा प्रमुख या नात्याने पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खासदार गिरीश बापट हे थेट जबाबदार असल्याने या दोघांवरही सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा.

'चंपा'ला पवारांशिवाय काही दिसत नाही : अजित पवार

पुणे महानगरपालिकेचा कारभार नगरसेवक नाही तर ठेकेदारच कारभार पाहतात. या परिस्थितीला सर्वस्वी भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे. पुण्याला सक्षम नेतृत्व नसल्यामुळे शहरात निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा वाढला असून त्यामुळे अपघात, नैसर्गिक आपत्ती यामध्ये दररोज अंदाजे दोन तरी, पुणेकरांचा बळी जात आहे. म्हणून पुणेकरांना आवाहन करतो की, भाजपाला सत्तेपासून दूर लोटत शहरातील ही मृत्यूची दहशत थांबवा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains congress leader mohan joshi criticize chandrakant Patil mp girish bapat