Pune Rains : आभाळ फाटले

Pune Rains : आभाळ फाटले

पुणे -  शहरात बुधवारी रात्री पावसाने अक्षरशः रुद्रावतार धारण केला होता. सलग दुसऱ्या दिवशी धुवाधार कोसळलेला पाऊस, आंबिल ओढ्याने घेतलेले आक्राळ-विक्राळ रूप यामुळे पुणेकरांची दयनीय अवस्था झाली. शेकडो वाहने वाहून गेली अन्‌ हजारो घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे जागोजागी घरे, दुकानांमध्ये, सोसायट्यांच्या पार्किंगपर्यंत शिरलेले पाणी काढण्यात पुणेकरांनी रात्र जागवली. देशात प्रथम क्रमांकाच्या ‘स्मार्ट सिटी’चे हे शहर रात्रभर पुराच्या पाण्याच्या संकटाशी झुंजत होते. 

शहरात रात्री नऊ वाजेपर्यंत जेमतेम ०.२ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्यात झाली होती. सर्व पुणेकर नित्यक्रम करत होते; पण इतक्‍यात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरवात झाली. मुसळधार सरी कोसळू लागल्या. पावसाचा वेग इतका प्रचंड होता, की काही मिनिटांमध्ये रस्त्याला नाल्याचे स्वरूप आले. वेगाने पावसाचे पाणी रस्त्यांवरून वाहू लागले. या पाण्याच्या प्रवाहाला इतकी जबरदस्त ओढ होती, की त्यात शेकडो वाहने डोळ्यादेखत वाहून जात होती. त्यातच शहरातील बहुतेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. गुरुवारी सकाळीही तो पूर्ववत झाला नव्हता. मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे नागरिकांना परस्परांशी संपर्क साधणे अवघड झाले होते, त्यातच अनेक ठिकाणी इंटरनेट बंद पडले होते. शहरात अंतर्गत भागातील अनेक रस्त्यांवर गुरुवारी सकाळी सर्वत्र वाहतुकीची कोंडी झाली होती. 

स्वारगेट-कात्रज प्रवास पाच तासांचा!
शहरातील रस्त्यावरून दोन-तीन फूट उंचीपर्यंत पाणी वेगाने वाहत असल्याने दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनेही रस्त्यांवरून चालवणे शक्‍य होत नव्हते. सातारा रस्त्यावर पाणी वाढू लागले. त्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. त्याच वेळी या रस्त्याच्या पर्यायी मार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी वाहने लावून चालत घरी जाण्याचा पर्याय सातारा रस्त्यावरील काही चालकांनी स्वीकारला.

नाल्यांचा श्‍वास कोंडला 
शहरातील प्रमुख पावसाळी ५२ नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साठला होता. पावसाळ्यापूर्वी ते स्वच्छ होतात, असा दावा महापालिकेने केला असला, तरी त्यांचा श्‍वास कोंडला असल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. त्यातच अनेक नाल्यांचे सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली महापालिकेने त्यात बांधकाम केल्यामुळे त्यांची वहन क्षमता कमी झाली अन्‌ आलेल्या पावसामुळे नाल्यांतील पाणी दुतर्फा नागरिकांच्या घरात शिरले. 

संध्याकाळी नऊ वाजता स्वारगेट येथून निघालो; पण घरी पोचायला रात्रीचे दोन वाजले. स्वारगेट ते कात्रज या सहा किलोमीटरच्या प्रवासासाठी पाच तास लागल्याची घटना प्रथमच मी बुधवारी रात्री अनुभवली.
- राकेश बोकील, अभियंता, माहिती तंत्रज्ञान

घराच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलेलं. तिसऱ्या मजल्यावरून माझ्या डोळ्यांदेखत दुचाकी वाहत गेल्याचं पाहिलं; पण काहीच करता येत नव्हतं.
- सागर वैद्य, किरकटवाडी

वाहने गेली वाहून
रस्त्याच्या कडेला, पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. यापैकी काही वाहने झाडाचे खोड, फांदी किंवा खांब याला अडकून बसली; पण काही वाहने वाहत नदीच्या प्रवाहापर्यंत गेली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com