#PuneRains : पुणे जिल्ह्यात १९ मृतांच्या वारसांना ७६ लाख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

जिल्हा प्रशासनाकडून अतिवृष्टीबाधितांना तातडीची मदत देण्यात येत आहे. बाधित कुटुंबीयांच्या बॅंक खात्यात ही रक्‍कम जमा करण्यात येत आहे. पुरंदर तालुक्‍यातील सर्व २४२ बाधित कुटुंबीयांना मदत दिली आहे. ज्यांचे बॅंक पासबुक पाण्यात वाहून गेले आहे; त्यांना संबंधित बॅंकेतून खाते क्रमांक उपलब्ध होण्यास अडचण येणार नाही.
- डॉ. जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी

पुणे - अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १९ मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांप्रमाणे ७६ लाखांची मदत देण्यात आली. अतिवृष्टीबाधित कुटुंबीयांना प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम रक्‍कम देण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर आणि जिल्ह्यात २८ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी १९ मृतांच्या वारसांना जिल्हा प्रशासनाकडून आर्थिक मदतीच्या धनादेश देण्यात आले. उर्वरित सहा मृत व्यक्‍तींच्या वाररसांचा संपर्क झालेला नाही. तीन मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. 

पुणे शहर, हवेली आणि पुरंदर तालुक्‍यातील साडेसहा हजार अतिवृष्टी बाधित कुटुंबीयांच्या घरांचे सर्वेक्षण होणे अपेक्षित आहे. त्यापैकी सुमारे साडेपाच हजार कुटुंबीयांचे पंचनामे झाले आहेत. पंचनामे झाल्यानंतर घरांचे प्रत्यक्षात किती नुकसान झाले, याची माहिती मिळेल. त्यानुसार अतिवृष्टी बाधितांना नुकसानभरपाई देण्यात येईल. शहरी भागातील अतिवृष्टी बाधितांना प्रत्येकी १५ हजार रुपये आणि ग्रामीण भागातील बाधित कुटुंबीयांना प्रत्येकी दहा हजार रुपये मदत करण्यात येईल. सध्या पाच हजार रुपये देण्यात येत असून, उर्वरित रक्‍कम देण्यासाठी सुमारे आठ कोटी रुपये लागतील. सरकारकडे निधीची मागणी करण्यात आल्याचे डॉ. कटारे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains death heir help administrative