Pune Rains : पूरग्रस्तांची प्रशासनावर आगपाखड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

पुराचा फटका बसलेल्या हजारो रहिवाशांपर्यंत मदतीसाठी पोचण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. सोसायट्या-वस्त्यांतील रस्त्यांवर वाहून आलेला गाळ, चिखल महापालिका दूर करणार कधी, असा प्रश्‍न रहिवासी विचारत आहेत. त्यांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे.

पुणे - पुराचा फटका बसलेल्या हजारो रहिवाशांपर्यंत मदतीसाठी पोचण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. सोसायट्या-वस्त्यांतील रस्त्यांवर वाहून आलेला गाळ, चिखल महापालिका दूर करणार कधी, असा प्रश्‍न रहिवासी विचारत आहेत. त्यांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे.

शासकीय मदत मिळत नसल्याने पूरग्रस्तांमध्ये प्रचंड नाराजी आहे. अरण्येश्‍वर भागातील रहिवाशांनी शुक्रवारी सकाळी काही वेळ रास्ता रोको आंदोलन करून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. पर्वती पायथा, अरण्येश्‍वर, टांगेवाला कॉलनी, तावरे कॉलनी, धनकवडीतील के. के. मार्केट, इंदिरानगर आदी भागांतील पूरग्रस्तांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित होत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. विजेचाही लंपडाव सुरू असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. इंदिरानगर, सुखसागरनगर, अरण्येश्‍वर भागातील काही अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी आज खुले झाले; परंतु त्यावर राडारोडा अजूनही कायम असल्याचे दिसून आले. तर वस्ती भागातील रहिवासी महापालिका, जिल्हा प्रशासनाच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. काही सामाजिक संस्था, संघटना तसेच शहरातील विविध राजकीय पक्षांकडून नाश्‍ता, पाणी, जेवण, कपडे, ब्लॅंकेट, बेडशीट आदी जीवनावश्‍यक साहित्य पुरविण्यात येत आहे. काही ठिकाणी महापालिका प्रशासन गाळ काढत परिसराची स्वच्छता करत आहेत. महापालिकेने काही भागांतील पूरग्रस्त नागरिकांची राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या शाळेत केली आहे. मात्र, तेथे प्रशासनाकडून पुरेशी मदत मिळत नसल्याचे रहिवाशांचे  म्हणणे आहे.

महापालिकेची मदत वेळेवर पोचली नसून, स्थनिक नागरिक आणि सामाजिक संघटना पाणी, जेवण आणि कपडे देत आहेत. विविध संघटना व संस्था मदत घेऊन येत आहेत.
- अमित पवार, पूरग्रस्त 

महापालिकेकडून परिसरातील गाळ काढण्यात येत असून, परिसर स्वच्छ केला जात आहे. तसेच सामाजिक संस्था व संघटनांकडून अत्यावश्‍यक साहित्य देण्यात येत आहे.
- राजेश्री धुमाळ, पूरग्रस्त 

पूरग्रस्तांना बिस्कीट, कपडे, सॅनिटरी नॅपकिन असे आवश्‍यक साहित्य देत आहोत. तसेच रोगराई पसरण्याची शक्‍यता असल्याने या संदर्भातील औषधांचेही वाटप करण्यात  येणार आहे.
- संजोता मालपाणी,  रोटरी क्‍लब ऑफ पुणे प्राइड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains flood victims