Pune Rains : सहा जणांसाठी ते ठरले देवदूत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

सर्व शहर बुधवारी रात्री झोपी जायच्या तयारीत होते. तेव्हाच दांडेकर पुलाजवळच्या आंबिल ओढा वस्तीमध्ये रात्री साडेनऊला पुराचे पाणी शिरले आणि बघता बघता याच पाण्याने रहिवाशांच्या छातीची उंची गाठली. त्यांनी मिळेल त्या ठिकाणी उंचावर धाव घेतली. क्षणार्धात डोळ्यांसमोर दिसणारे संसार, घरे, धान्य आणि पाहिलेली स्वप्ने पाण्याखाली गेली. येथील सर्व्हे नंबर १३३ मध्ये राहणारे हनुमंत फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यावेळी सहा लोकांचे प्राण वाचविले.

पुणे - सर्व शहर बुधवारी रात्री झोपी जायच्या तयारीत होते. तेव्हाच दांडेकर पुलाजवळच्या आंबिल ओढा वस्तीमध्ये रात्री साडेनऊला पुराचे पाणी शिरले आणि बघता बघता याच पाण्याने रहिवाशांच्या छातीची उंची गाठली. त्यांनी मिळेल त्या ठिकाणी उंचावर धाव घेतली. क्षणार्धात डोळ्यांसमोर दिसणारे संसार, घरे, धान्य आणि पाहिलेली स्वप्ने पाण्याखाली गेली. येथील सर्व्हे नंबर १३३ मध्ये राहणारे हनुमंत फडके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यावेळी सहा लोकांचे प्राण वाचविले.

शेजारील ओढ्याची संरक्षक भिंत कोसळल्यामुळे पाण्याची पातळी २० फुटांपर्यंत वाढत गेली. वस्तीमध्ये चार वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या वृद्ध महिलांना फडके आणि त्यांच्या मित्रांनी पाठीवर उचलून बाहेर काढले. तसेच, पाण्याच्या रौद्र प्रवाहातही राजकीय पक्षाच्या पाटीला घट्ट पकडून रात्रभर उभी असलेली युवती आणि घराच्या छतावर रात्रभर भिजणाऱ्या युवकाला वाचविण्यात त्यांना यश आले. घटनेचा थरार सांगताना फडके म्हणाले, ‘‘उराला भिडलेल्या पाण्यात वाट काढत आम्ही मित्रांनी लोकांना बाहेर काढले. अंगात असलेल्या कपड्यानिशी लोकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. कुणाच्या घरात लग्नासाठी साठविलेले पैसे होते, तर कुणाच्या घरात वर्षभराचे धान्य. नागरिकांनी एकमेकांची मदत केली. परंतु, घटना घडल्यानंतरही  दुपारी एकपर्यंत प्रशासनाचा  कोणताही कर्मचारी इकडे 
फिरकला नाही.’’

या कालावधीत लोकांना प्यायला पाणी आणि चिमुरड्या बालकांना खायला अन्न नव्हते. शेजारील साने गुरुजी स्मारकात प्रियांका सोनावणे यांच्या मदतीने नागरिकांची व्यवस्था करण्यात आली. या पुरामुळे जवळजवळ शंभर घरांमध्ये गुडघाभर चिखल साचला आहे.
- दीपक म्हस्के, स्थानिक रहिवासी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains hanumant phadke save Six person life

टॅग्स