Pune Rains : माहेरवाशिणीसारखी नाचली कऱ्हा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पुरंदर तालुक्‍यात झालेल्या जोरदार पावसाने कऱ्हा नदीला महापूर आला. तब्बल 11 वर्षांनंतर आलेल्या या महापुराच्या पाण्याने बारामती तालुक्‍यातील शेकडो एकर शेती कवेत घेतली.

बारामती (पुणे): पुरंदर तालुक्‍यात झालेल्या जोरदार पावसाने कऱ्हा नदीला महापूर आला. तब्बल 11 वर्षांनंतर आलेल्या या महापुराच्या पाण्याने बारामती तालुक्‍यातील शेकडो एकर शेती कवेत घेतली. उभ्या पिकांमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले असून, शेतातील मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बारामती तालुक्‍यातील काऱ्हाटी, फोंडवाडा, कऱ्हावागज, अंजनगाव आदी परिसरातील बंधाऱ्यांना वळसा घालून पुराचे पाणी कऱ्हा नदीतून थेट बाजूच्या शेतात घुसले आणि शेतातील पिकांमधून वाट काढत पाण्याने माती वाहून नेली. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत पाणी बंधाऱ्याच्या बाहेर पडले नव्हते. मात्र, त्यानंतर पाणी वाढू लागले आणि पहाटे पावणेदोनच्या सुमारास नाझरे धरणातून सोडलेला 80 हजार क्‍सुसेक पाण्याचा विसर्ग सकाळी येथे पोचला. त्यानंतर जसजसे पाणी वाढेल, तसतसे बंधाऱ्यातून बाजूने मार्ग काढत हे पाणी शेतात घुसले. या सर्व भागातील कित्येक एकर शेतीमध्ये घुसलेल्या पाण्याने नदीकाठच्या भागातील विहिरींनाही नुकसान पोचवले. आता विहिरींमध्ये गेलेल्या गाळामुळे विहिरींच्या पाणी पातळीवर परिणाम होण्याची चिन्हे आहेत.

कित्येक वर्षांनंतर असा पूर बघितला. काही वर्षांपूर्वी असा पूर आला होता. मात्र, आताचा पूर बऱ्याच वर्षांनी पाहतोय. या पुरामुळे शेतीत पाणी घुसले आणि माती वाहून गेली. शेतकऱ्यांचे नुकसान होईल.
- अप्पा मोरे, ज्येष्ठ नागरिक, अंजनगाव (ता. बारामती)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains karha river flood at purandar taluka