Pune Rains : होय, हा शहराच्या अस्तित्वाचा प्रश्‍न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

‘हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर खबरदारीचा उपाय करूनही बुधवारी रात्री कात्रज आणि कोंढवा परिसरात पूर आला. या पार्श्‍वभूमीवर परिसरातील ओढ्या-नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांवर प्रामाणिकपणे कारवाई करण्याची गरज आहे; कारण हा शहराच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे,’’ अशा शब्दांत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी कबूल केले.

पुणे - ‘‘हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर खबरदारीचा उपाय करूनही बुधवारी रात्री कात्रज आणि कोंढवा परिसरात पूर आला. या पार्श्‍वभूमीवर परिसरातील ओढ्या-नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांवर प्रामाणिकपणे कारवाई करण्याची गरज आहे; कारण हा शहराच्या अस्तित्वाचा प्रश्‍न आहे,’’ अशा शब्दांत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी कबूल केले.

मुसळधार पावसामुळे कात्रज, कोंढवा आणि येवलेवाडी परिसरातील ओढ्यांना पूर आला. या भागातील दहा हजारांहून अधिक नागरिकांना त्याचा फटका बसला. शहरात १० जणांना आपला जीव गमवावा लागला. ओढ्या-नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे त्यांचा प्रवाहात अडथळा निर्माण होत आहे. तसेच, परिसरातील अनेक बांधकामे चुकीच्या पद्धतीने झाली आहेत.  याला महापालिका प्रशासनाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याची टीका होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त राव यांना विचारले असता त्यांनी ही कबुली दिली.

ते म्हणाले, ‘‘बुधवारी रात्री तीन तास अतिवृष्टी झाली, त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. आज बाधित भागांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी ओढे-नाल्यांच्या कडेने बांधकामे झाली असल्याचे दिसून आले, त्यामुळे त्यांच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाला आहे. याचा विचार गांभीर्याने करून या भागाचा पुन्हा एकदा सर्व्हे करण्याची गरज आहे. धोकायदाक जागेवरील झोपड्या हटवून त्यांचे पुनर्वसन करण्याची गरज आहे. सिंमेटचे रस्ते, सांडपाणी वाहिन्यांची अपुरी क्षमता आणि पावसाचा जोर यामुळे ही समस्या उद्‌भवली.’’

अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती
हवामान खात्याने आणखी दोन दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. पूरस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी  बाधित भागामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून अडीचशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे, असे सांगून राव म्हणाले, ‘‘देवदूत, अग्निशामक दल आणि एनडीआरएफच्या तीन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या भागातील रुग्णालयांनादेखील तातडीने जखमींवर उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.’’

पुरात बाधित झालेल्या कुटुंबीयांचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. स्थलांतर करण्यात आलेल्या कुटुंबीयांना वस्तू स्वरूपात तातडीची मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नक्की किती नुकसान झाले हे समोर येईल.
- सौरभ राव, आयुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains The municipal commissioner Saurabh Rao confessed question of the existence of the city