Pune Rains : पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर पाण्याचे लोंढे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

रस्ते गेले पाण्याखाली
पावसामुळे काही मिनिटांत कर्वे रस्ता, प्रभात रस्ता आणि विधी महाविद्यालय रस्त्यांवर प्रचंड पाणी साचले, त्यामुळे कर्वे रस्त्यावरील अभिनव चौक आणि आजूबाजूचा भाग पूर्णपणे पाण्यात गेला, त्यामुळे भीतीपोटी वाहनचालक पुढे जात नव्हते. त्यामुळे वाहनांची भलीमोठी रांग लागली; तेवढ्यात गरवारे महाविद्यालयाजवळील झाड पडल्याने चालकांची धावपळ उडाली. त्याचवेळी विधी महाविद्यालय रस्त्यावरची वाहने पाण्यातच उभी होती. प्रभात रस्त्याकडेला बहुतांशी ठिकाणी पाण्याची डबकी साचल्याने वाहतुकीचा वेग कमी झाला. कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता आणि प्रभात रस्त्यांवर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. वाहनचालकांना पर्यायी रस्ताच नव्हता, त्यामुळे या तिन्ही रस्त्यांवर पाऊस, पाणी, कोंडी आणि भीतीचे वातावरण होते.

पुणे - पावसाच्या सरी कोसळताच वर्दळीच्या रस्त्यांवर ओढ्या-नाल्यांसारखे पाणी वाहू लागले, ते जागोजागी तुंबलेही. भरीस भर काही ठिकाणी झाडे पडल्याने अर्धा-पाऊण तासातच संपूर्ण शहराला वाहतूक कोंडीने वेढले. आधीच पावसाचा जोर पाहून धडकी भरलेल्या पुणेकरांवर कोंडीत अडकण्याची वेळ ओढवली. पाऊस वाढण्याच्या भीतीने घर गाठण्याची धडपड करणाऱ्या पुणेकरांची वाट ऐनवेळी वाहतूक कोंडीने अडविली. 

शहरात बुधवारी सायंकाळी पावसाला सुरवात झाली तेव्हाच सरकारी, निमसरकारी कार्यालये सुटल्याने रस्त्यांवर रहदारी होती. त्यानंतर काही मिनिटांतच प्रमुख रस्ते आणि चौकाचौकांतून पाण्याचे लोंढे वाहू लागले. जागोजागी पाण्याची डबकी साचल्याने पाहता-पाहता रस्त्यांना ओढ्या-नाल्यांचे स्वरूप आले. काही रस्त्यांवरील वाहणारे पाणी पाहून वाहने पुढे नेण्याचे धाडस चालक करीत नव्हते, त्यामुळे कर्वे रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या. कोंडीमुळे चालकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर केला. मात्र, अशा रस्त्यांवर एकाचवेळी वाहने आल्याने तेही पूर्णपणे ‘जॅम’ झाले. जंगली महाराज रस्त्यापाठोपाठ टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यांवरील ‘ट्रॅफिक जॅम’ झाली. त्याचा परिणाम स्वारगेट, डेक्कन, खंडुजीबाबा चौक, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा भागांतही जाणवला. बहुतांशी भागांत कोंडी झाल्याने शहरात येणारे प्रमुख मार्गही ‘जॅम’ झाले होते. 

पाऊस ओसल्यानंतर मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहने पुढे सरकली. मात्र, पाण्याचा वेग पाहून वाहनचालकांत प्रचंड भीती होती. विशेषतः दुचाकीस्वारांचे हाल झाले. त्याचवेळी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) थांब्यावरील प्रवाशांची प्रचंड गरैसोय झाली. पावसाचा जोर थांबण्याची चिन्हे नसल्याने प्रवाशांमध्ये भीती होती. शिवाजीनगर, पुणे रेल्वेस्थानक, पुणे-सोलापूर रस्ता, नगर, पुणे-सातारा रस्त्यांवरील वाहनचालकांना फटका बसला. सारसबाग, मित्र मंडळ चौक आणि अरण्येश्‍वर भागांतही पाणी साचल्याने लोकांची गैरसोय झाली. वाहतूक नियंत्रक (सिग्नल) दिवे बंद पडल्याने पुन्हा चौका-चौकांत वाहतूक विस्कळित झाली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Rains water on road by heavy rain