तरुणांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्रउभारणीसाठी करावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajnath Singh

खडकी येथील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (एसआयएमएस) येथे ‘फिल्ड मार्शल माणेकशॉ मेमोरियल व्याख्यानमाले’त ‘राष्ट्रउभारणीत युवकांचे योगदान’ या विषयवार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते.

Rajnath Singh : तरुणांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्रउभारणीसाठी करावा

पुणे - देशात ९० हजारांहून अधिक स्टार्टअप आहेत. त्यामध्ये तरुणांचा समावेश सर्वाधिक आहे. तसेच या क्षेत्रात १०० हून जास्त युनिकॉर्न तयार झाले असून, त्यातही तरुणवर्गच कार्यरत आहे. तरुणवर्ग हा ऊर्जेचे भांडार असून, त्यांचा वापर चुकीच्या दिशेने होता कामा नये. त्यांच्या ऊर्जेचा वापर राष्ट्रउभारणीत तसेच समाजहितासाठी व्हायला हवा. त्यामुळे तरुणांच्या ऊर्जेला नियंत्रित करत योग्य दिशा देण्याची गरज आहे, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्‍यक्त केले.

खडकी येथील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् (एसआयएमएस) येथे ‘फिल्ड मार्शल माणेकशॉ मेमोरियल व्याख्यानमाले’त ‘राष्ट्रउभारणीत युवकांचे योगदान’ या विषयवार ते बोलत होते. या प्रसंगी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, संजीवनी मुजुमदार, डॉ. विद्या येरवडेकर, प्राचार्य प्रा. रजनी गुप्ता, ब्रिगेडिअर राजीव दिवेकर (निवृत्त) आदी उपस्थित होते. या वेळी मुलांच्या निवासी संकुलाचे उद्‍घाटन सिंह यांच्या हस्‍ते करण्यात आले.

सिंह म्हणाले, ‘देशातील व्यवस्थापनाची (मॅनेजमेंट) ताकद ही वेगाने वाढणाऱ्या विकासाला हातभार लावणारी असली पाहिजे. देशात सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात मॅनेजमेंट असणे महत्त्वाचे आहे. जगभरात मॅनेजमेंटची मोठी गरज असून, त्याची वाढती मागणी पाहता आपल्या देशातील विद्यार्थी या क्षेत्रासाठी तयार होत कार्यरत होत आहेत. तंत्रज्ञानास प्रोत्साहन देऊन उद्योगात परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे.

युवकांत प्रचंड ऊर्जा असून, त्याआधारे अनेक कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. त्यासाठी आपली संस्कृती, मूल्ये, परंपरा ही तरुणांच्या ऊर्जेसाठी नियंत्रक आणि संचालक म्हणून काम करतील. सध्या सरकारने देशात अशी परिसंस्था निर्माण केली आहे, ज्याचा फायदा घेऊन देशातील युवक आर्थिक क्षेत्रात क्रांती घडवू शकतात.’’ कॉर्पोरेट संस्थांमध्ये अनेकांना ताण असल्याचे जाणवते. या क्षेत्रातील लोकांची स्थिती ही प्रेशर कुकरसारखी असते. मात्र मन शांत कसे ठेवावे, हे तरुणांनी शिकले पाहिजे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्येही संयमी राहणे, ताण कमी करण्याबाबत सांगितले आहे. त्यामुळे या ग्रंथातून अशा मॅनेडमेंटचे धडे घ्यायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

भारताच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष

या दशकभरात भारताने जागतिक स्तरावर आपली एक नवीन आणि सक्षम ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आज भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणती भूमिका मांडत आहे, याकडे जग उत्सुकतेने पाहत आहे. आपला देश हा पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनत, जगातील सर्वांत वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून प्रगती करत आहे. निर्यात असो किंवा एफडीआयचा प्रवाह, आयकर असो किंवा जीएसटीचे विक्रमी संकलन यामध्ये देश चांगले काम करत आहे.

देशात संगणक, इलेक्ट्रॉनिक आदी क्षेत्रांतील अभियंते, डॉक्टर, पदवीधर तयार केले जात आहेत. मात्र हे शिक्षण देताना त्यांच्यामध्ये मानवता आणि संस्कृती रुजविण्यात आपण थोडे मागे पडत आहोत. देशाने स्‍वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण केली. तसेच जी२० मध्ये वसुधैव कुटुंबकम ही भावना पुढे आणली. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही भावना निर्माण करण्यासाठी प्रगतीच्या प्रवासात आपली तत्त्वे जपणे गरजेचे आहे. आफ्रिकी देशांना भारताप्रती असलेली भावना तसेच या देशात त्यांना शिक्षणाची संधी मिळत असल्याने त्यादृष्टीने प्रयत्‍न करण्याची गरज आहे.

- शां. ब. मुजुमदार, संस्थापक अध्यक्ष, सिम्बायोसिस