पुणे- रांजणगाव प्रवास कधी होणार सुसाट ?

Pune-Ranjangav-Road
Pune-Ranjangav-Road

पुणे- नगर रस्त्यावर प्रवास करताना पुणे महापालिका हद्दीनंतर सुरू होणारा पुणे- रांजणगाव टप्पा प्रवाशांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे. या टप्प्यात रोजच कुठे ना कुठे वाहतूक कोंडीत अडकवण्याचा अनुभव प्रवाशांना येतोच. या वाहतूक कोंडीची कारणे व त्यातून सुटका होण्यासाठी करण्याच्या उपाययोजनांचा आढावा...

खांदवेनगरला वॉर्डन हवा 
खांदवेनगरकडे वळणाऱ्या वाहनांमुळे कोंडी वाढते. या मधल्या टप्प्यात दुभाजकच नसल्याने पूर्वी समांतर रांगा लागून फारच कोंडी होत असे. मात्र काही स्थानिक उद्योजकांनी पुढाकार घेत येथे तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी बॅरिगेट्‌स उभे केल्याने वाहतूक कोंडी कमी झाली. परंतु या टप्प्यात कायमस्वरूपी मोठ्या दुभाजकासह वळणाऱ्या वाहनांसाठी भुयारी मार्ग अथवा उड्डाण पुलाची गरज आहे. तसेच सध्या पोलिस वा ट्रॅफिक वॉर्डनची गरज आहे.  

लोणीकंद व तुळापूर फाटा चौक प्रशस्त करावा
मरकळ औद्योगिक क्षेत्र व थेऊरकडे ये- जा करणारी जडवाहने लोणीकंद व तुळापूर फाटा या दोन्ही चौकांत वळत असतात. त्यामुळे पुणे व नगर बाजूकडील वाहनांच्या रांगा लागून प्रामुख्याने कोंडी होते. त्यातच तुळापूर फाटा चौकात हॉटेल व्यावसायिकांमुळे थांबणाऱ्या वाहनांचे व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळेही कोंडी वाढते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हे दोन्ही चौक अधिक प्रशस्त करण्याची व या दोन्ही ठिकाणी उड्डाण पूल किंवा भुयारी मार्गाचीच गरज आहे. 

साचणाऱ्या पाण्याबाबत कोरेगावात उपाय करावा
कोरेगाव येथे वढू बुद्रूक व पुढे ढेरंगेवस्ती व डिंग्रजवाडीकडे ये- जा करणाऱ्या वाहनांमुळे कोरेगावचा वढू चौक व डिंग्रजवाडी फाटा चौकात सायंकाळी काही प्रमाणात कोंडी होते. गावातील मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात साठणाऱ्या पाण्यामुळेही पुणे व नगर बाजूकडे वाहनांच्या रांगा लागून मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने ड्रेनेजसह इतर काम सुरू केले आहे. मात्र पावसाळ्यात येथे साचणाऱ्या पाण्याच्या प्रमाणानुसार ठोस उपाययोजनेची गरज आहे. 

ठिकठिकाणी उड्डाण पुलांची गरज 
पुणे- शिरूर मार्गावर वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी रस्ता रुंदीकरण किंवा उड्डाण पूल हे प्रमुख पर्याय असले; तरीही आठपदरीकरणाच्या कामासाठी भूसंपादनाला लागणारा खर्च व वेळ लक्षात घेता ताब्यात असलेल्या जागेवर रुंदीकरण आणि वाघोली, कोरेगाव भीमा व शिक्रापूरसारख्या गर्दीच्या ठिकाणी उड्डाण पूल हे व्यवहारी पर्याय आहेत. यापूर्वी बीओटी तत्त्वावर सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चाचा वाघोली ते शिक्रापूर हा सलग अंतराचा उड्डाण पूल प्रस्तावित होता. हा पर्याय त्यावेळी आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने रेंगाळला. मात्र आता सर्वत्र होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे या सलग अंतराच्या उड्डाण पुलाची गरज आहे.

रांजणगावपर्यंत मेट्रो हवी
सध्या वेगवान प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने पुणे शहराच्या चोहोबाजूने मेट्रोचे जाळे वाढत आहे. मोठ्या शहरात उड्डाण पुलाचा खर्च व मर्यादेच्या तुलनेत मेट्रोची उपयुक्तता व सुलभता लक्षात घेता नगर रस्त्यावरही मेट्रोचा विस्तार प्रथम वाघोली, नंतर शिक्रापूर व पुढे रांजणगावपर्यंत झाल्यास वेगवान प्रवासी वाहतुकीचा मार्ग खुला होईल, तसेच औद्योगिक विकासालाही वेग येईल.

वाघोली- लोणीकंद बायपास सुरू करावा  
पुणे- शिरूर टप्प्यात वाघोलीतील वाहतूक कोंडी प्रवाशांना अतिशय त्रासदायक वाटते. रस्त्यालगतच्या टपरी, हॉटेल व्यावसायिकांच्या ग्राहकांची वाहने आणि खासगी व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे बेशिस्त पार्किंगवरही पोलिसांकडून सातत्याने कारवाई होणे गरजेचे आहे. मात्र या प्रश्‍नावर आवाज उठवल्यामुळे या ठिकाणी रुंदीकरणाची कार्यवाही सुरू झाली आहे, ही समाधानाची बाब आहे. गावात किमान सहापदरीकरणाबरोबरच उंच व आकर्षक दुभाजक, सिग्नल यंत्रणा, ड्रेनेज यासह अंतर्गत रस्तेही पक्के व प्रशस्त करण्याच्या कामांना वेग आला आहे. मात्र येथे चोहोबाजूंनी वेगाने वाढणारी लोकवस्ती व केसनंदचा औद्योगिक परिसर लक्षात घेऊन या कामास आणखी गती देण्याबरोबरच येथून जुना जकातनाका येथे निघणारा पर्यायी मार्ग व बरेचसे काम झालेला वाघोली- लोणीकंद बायपास मार्गही सुरू करण्याची गरज आहे. वाघेश्‍वर मंदिर, छत्रपती शिवाजी पुतळा चौक, केसनंद फाटा येथे वाहतुकीमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी नागरिक यांची मोठी कसरत होते.

पेरणे फाटा व विजयस्तंभ चौकात उड्डाण पूल हवा
पेरणे व वढू खुर्द गावाकडे ये- जा करणारी वाहने पेरणेफाटा व विजयस्तंभ चौकात वळत असतात. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागून कोंडी होते. पेरणे फाटा चौकात रस्त्यालगतचे भाजीपाला व्यावसायिक, टपरीचालक, हॉटेल यांच्या ग्राहकांची वाहने व प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचे बेशिस्त पार्किंग विरुद्ध दिशेने येणारी वाहने, यामुळेही कोंडी वाढते. यावर ठोस तोडगा काढण्यासाठी रस्ता रुंदीकरणासह उड्डाण पूल हा पर्याय ठरेल.

सणसवाडी फाटा चौकातील बाजारामुळे होतेय कोंडी 
सणसवाडी फाटा येथेही मुख्य रस्त्यावर सायंकाळी भरणारा बाजार आणि हातगाडी व विक्रेत्यांची थांबणारी वाहने, अवैध प्रवासी वाहनांमुळे सायंकाळी कोंडी वाढते. तसेच, नरेश्‍वर व इस्पात रस्त्याकडे आणि सणसवाडी गावाकडे ये- जा करणाऱ्या वाहनांमुळे सणसवाडी फाटा चौकात सायंकाळी काही प्रमाणात कोंडी होते. येथेही उड्डाण पूल हाच योग्य पर्याय ठरेल. 

शिक्रापूर, रांजणगावात बेशिस्त पार्किंगचा फटका 
वाघोली पाठोपाठ सर्वाधिक वर्दळीचे चौक म्हणून शिक्रापुरातील चाकण चौक, पाबळ चौक हे ओळखले जातात. येथेही मुख्य रस्त्यालगत थांबणाऱ्या लाब पल्ल्यांच्या प्रवासी बस, अवैध प्रवासी वाहने, हातगाडी, विक्रेत्यांची गर्दी, ग्राहकांची वाहने, बेशिस्त पार्किंग, यामुळे सायंकाळी कोंडी वाढते. तसेच श्री क्षेत्र रांजणगाव येथे महागणपती दर्शनासाठी येणारे भाविक व पंचतारांकित वसाहतीमुळे वाहनांची मोठी गर्दी असते. सकाळी व सायंकाळी रांजणगाव, कारेगाव, सरदवाडी येथे कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसही मोठ्या प्रमाणात असतात. मोठ्या प्रमाणावर राहण्यासाठी आलेल्या कामगारांची कारेगावात वर्दळ असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com