Pune : रेशन दुकानदारांना लवकरच फोरजी इ-पॉस मशीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ration card

Pune : रेशन दुकानदारांना लवकरच फोरजी इ-पॉस मशीन

पुणे : रेशन दुकानदारांना जुन्या टूजी ई-पॉस मशिनमधील तांत्रिक त्रुटींमुळे धान्य वितरण करण्यास अडचणी येत आहेत. याबाबत रेशन दुकानदार संघटनांकडून फोरजी ई-पॉस मशिन देण्याची मागणी केली जात होती. त्यावर आता पुरवठा विभागाकडून रेशन दुकानदारांना लवकरच फोर जी ई-पॉस मशिन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

राज्यात एक मे २०१८ पासून संगणकीय वितरण प्रणालीद्वारे ई-पॉस मशिनद्वारे धान्य वितरण सुरू करण्यात आले. त्यासाठी राज्य सरकारकडून तीन कंपन्यांची निवड करण्यात आली होती. रेशनवरील धान्य वितरणात ई-पॉस मशिन महत्त्वाची यंत्रणा आहे. ई-पॉस मशिनवर धान्य वितरण करताना योजनानिहाय शिधापत्रिकाधारकांचे थंब घ्यावे लागतात.

परंतु तांत्रिक अडचणीमुळे लवकर थंब इम्प्रेशन होत नाही. एका शिधापत्रिकाधारकाला १५ ते २० मिनिटे वेळ द्यावा लागतो. परिणामी जुन्या टू जी ई पॉस मशिनमधील त्रुटीमुळे धान्य वितरण प्रणाली विस्कळित झाली आहे.

अनेक ई-पॉस मशिनमधील सिमकार्ड निरुपयोगी झाले असून, रेशन दुकानदार आपल्या मोबाईलद्वारे हॉटस्पॉट वापरून धान्य वितरण करीत आहेत. दिवाळीतही मशिनमधील तांत्रिक बिघाडामुळे रेशन दुकानदारांना शिधावाटप करताना बऱ्याच अडचणी आल्या. या कारणावरून ग्राहक आणि रेशन दुकानदार यांच्यात वादही होत आहेत. त्यामुळे रेशन दुकानदार फोर जी ई-पॉस मशिन उपलब्ध करून देण्याबाबत आग्रही होते.

रेशन दुकानांमधून वाय-फाय सुविधा

‘पीएम-वाणी’ योजनेंतर्गत रेशन दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी अल्प दरात इंटरनेट वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असून, याबाबत राज्य सरकारने नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. रेशन दुकानापासून शंभर ते दोनशे मीटर परिघात या योजनेचा नागरिकांना लाभ घेता येणार आहे.

ज्याठिकाणी इंटरनेटची कमी सुविधा विशेषत: ग्रामीण भागात या सुविधेचा अधिक लाभ होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (ता. १४) दुपारी बैठक पार पडली. पुरवठा उपायुक्त त्रिभुवन कुलकर्णी, बीएसएनएल कंपनीचे अधिकारी आणि रेशन दुकानदार संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

रेशन दुकानदारांच्या प्रश्नांबाबत अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघाची मंत्रालयात बैठक झाली. या वेळी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी नवीन फोर जी ई-पॉस मशिन देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भविष्यात शिधा वाटपास अडचणी येणार नाहीत, अशी अपेक्षा आहे.

- गणेश डांगी, अध्यक्ष- पुणे शहर, स्वस्त धान्य दुकानदार संघटना

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील स्थिती :

रेशन दुकाने : ७७०

शिधापत्रिकाधारकांची संख्या :३ लाख १ हजार ८८६

लाभार्थी संख्या :१२ लाख ४३ हजार १४८

पुणे जिल्हा ग्रामीण :

शिधापत्रिकाधारक संख्या : ५ लाख ३२ हजार

लाभार्थी संख्या :

सुमारे २४ लाख ७१ हजार