esakal | Pune: भरती प्रक्रियांबाबत कंपन्यांवर अविश्वास
sakal

बोलून बातमी शोधा

recruitment

पुणे : भरती प्रक्रियांबाबत कंपन्यांवर अविश्वास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ग्रामविकास विभाग असो की आरोग्य विभाग, एवढेच काय म्हाडाच्या सरळसेवा भरतीतही गोंधळाची परंपरा कायम आहे. राज्यातील अशा सर्व भरत्यांची प्रक्रिया वादग्रस्त खासगी कंपन्यांकडून काढून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) किंवा इतर जबाबदार संस्थेकडे देण्यात यावी, अशी मागणी आता उमेदवार करू लागले आहे.

फेब्रुवारी २०२१ मधील आरोग्य विभागाच्या भरतीत गोंधळ झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तसेच सप्टेंबरमधील आरोग्य विभागाची भरती, तर ऑक्टोबर मधील ग्रामविकास विभागाची जिल्हास्तरीय भरती प्रक्रिया अपुऱ्या तयारीमुळे आणि उमेदवारांच्या तक्रारींमुळे पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. आता तर म्हाडाच्या भरती प्रक्रियेतही तांत्रिक अडचणी दिसू लागल्या असून, या कंपन्यांवरचा विश्वास उडाल्याचे उमेदवारांनी म्हटले आहे.

हेही वाचा: धुळे : 'तो' मृत्यूदेह विधवा तरूणीचा, प्रेम संबंधातून खून

म्हाडाच्या भरतीतील उमेदवार सागर पाटील म्हणाले, ‘‘म्हाडाच्या भरतीत मोठा घोळ झाला आहे. ही प्रक्रिया एमपीएससी, टाटा कन्सल्टन्सी किंवा एमकेसीएल सारख्या विश्वासार्ह कंपन्यांच्या माध्यमातून घेण्यात यावी.’’ सर्व खासगी कंपन्यांची कायदेशीर तपासणी आणि परवानगी देण्यामध्ये महाआयटीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. उमेदवारांच्या प्रश्नासंबंधी महाआयटीच्या संचालिका आभा शुक्ला यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

भरती प्रक्रिया पारदर्शक होईल का, याबद्दल साशंकता निर्माण झालीय. या आधीच वर्षानुवर्षे विविध विभागातील भरती प्रक्रिया प्रलंबित होती.

- तुषार देशमुख

आरोग्य विभागाच्या या आधीच्या परीक्षेतही अशी गडबड झाली होती. ही भरती एमपीएससी कडून करायला हवी.

- दत्तात्रय कुंभार, जळगाव

हेही वाचा: अस्तरीकरणासाठी हवेत ३०० कोटी : अशोक पवार

सरकार फॉर्म भरून घेतल्यावर सरळसेवेच्या परीक्षा घ्यायलाच मुद्दाम तीन-तीन वर्षे लावते. शेवटी विद्यार्थीही वैतागून ‘कशीही घ्या, पण परीक्षा घ्या’ या मागणीवर येतात. मग कुठे यांना कळवळा येतो आणि कुठल्यातरी खासगी कंपनी मार्फत परीक्षा घेतली जाते.

- स्वागत चव्हाण, सांगली

आरोग्य सेवक लेखी परीक्षेतील गोंधळ पाहता भरती प्रक्रियेबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परीक्षेकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया पार पडायला हवी

- अश्विनी गोरे, पुणे

loading image
go to top