
Pune : प्रदुषित नीरा नदीचा अहवाल केंद्रीय अन्नप्रक्रिया व जलशक्ती विभागाकडे जाणार
माळेगाव - बारामती, इंदापूरकरांचे आणि हजारो एकर शेतीचे आरोग्याला बाधित ठरत असलेल्या नीरा नदीच्या दुषित पाण्याचा पाहणी अहवाल तयार केला जाईल. तसेच हा अहवाल केंद्रीय अन्नप्रक्रिया व जलशक्ती विभागाकडे गेल्यास निश्चितपणे या समस्येवर कायमचा तोडगा निघेल,
असे आश्वासन नॅशनल रिव्हर कंजरवेशनचे डायरेक्टर (एनआरसी़डी) अशोक बाबू व नॅशनल वाॅटर कमिशनचे अभिषेक गौरव यांच्या पथकाने आज सांगवी (ता.बारामती) येथे शेतकऱ्यांना दिले. नीरा नदीपात्रात दूषित पाणी सोडणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, अशीही आग्रही मागणी उपस्थितांनी केली. यावेळी सांगवी येथील भाजपचे कार्यकर्ते युवराज तावरे, शेतकरी मिथून आटोळे आदींनी येथील नदीच्या प्रदुषणाबाबतची वस्तूस्थिती पुराव्यासह संबंधित अधिकाऱ्यांपुढे मांडली.
नीरा, कांबळेश्वर सांगवी ते अकलूज हद्दीतील प्रदुषित निरा नदीची पहाणी नॅशनल रिव्हर कंजरवेशनचे डायरेक्टर (एनआरसी़डी) अशोक बाबू व नॅशनल वाॅटर कमिशनचे अभिषेक गौरव यांच्या पथकाने केली. त्यामध्ये नीरा नदीत येत अललेल्या दुषित पाण्याचे उगमस्थान शोधून काढण्याच्या उद्देशाने ही पहाणी महत्वपुर्ण ठरली. यावेळी कांबळेश्वर, सांगवी, शिरवली, खांडज, नीरावागज हद्दीत लोकांचे म्हणणे व नदीमधील पाण्याच्या प्राप्त स्थितीनुसार अहवाल तयार केला.जाईल,
असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय अन्नप्रक्रिया व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनी यापुर्वी दुषित पाण्याने वाहत असलेल्या नीरा नदीची पाहणी केली होती. त्याच्यापुढे शेतकऱ्यांसह शकडो गावकऱ्यांनी नदीच्या दुषित पाण्याविषयी आणि आरोग्याविषयी गाऱ्हाणी मांडली होती.
तसेच काही ठिकाणी संबंधित पदाधिकाऱ्यांना लोकांच्या रोषालाही सामोरे जावे लागते होते. बारामती, इंदापूर हद्दीमधील नदी काठच्या जमिनी ज्ञारपड होत असून त्या जमिनींचे आरोग्य सुधारण्यासाठी व प्रदुषणाला आळा घालण्यासाठी केंद्रातील शास्त्रज्ञांसह प्रदुषण नियंत्रण बोर्डाची टिम सर्वे होण्यासाठी पाठविली जाईल,
असे मंत्री पटेल यांनी त्यावेळी सांगितले होते. त्या पार्श्वभूमिवर आज मंगळवारी नॅशनल रिव्हर कंजरवेशनचे डायरेक्टर (एनआरसी़डी) अशोक बाबू व नॅशनल वाॅटर कमिशनचे अभिषेक गौरव यांच्या पथकाच्या पाहणी दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले होते. या पथकामध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र पोलूशन कंन्ट्रोल बोर्डचे संजीव टाटू, नंदकूमार गुजर, इन्व्हरमेंट डिपार्टमेंटचे जाॅय ठाकूर, सेंन्ट्रल पोलूशन कंन्ट्रोल बोर्ड (पुणे) चे भारत कुमार शर्मा यांना उपस्थितांनी आजवर केलेल्या तक्रारींची आठवण करून दिली.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे, प्रांताधिकारी वैभव नावडेकर, पांडूरंग कचरे, सतिश फाळके, राजेश देवकाते, अॅड. गोविंद देवकाते, धैर्यशिल तावरे, राजेश कांबळे, पी.के.जगताप, मिथून आटोळे, केशव देवकाते आदींनी प्रदुषित पाण्याच्या समस्येबाबत मुद्देनिहाय भूमिका मांडली. `` नीरा नदीचे दूषित पाणी शेतीला देऊ शकत नाही, तर नीरा डावा कालव्याचे हक्काचे पाणी शेतील मिळण्याचा कालावधी तब्बल ६० ते ७० दिवसांवर पोचला आहे.
हा दुहेरी अन्याय नदीकाठच्या शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी किती दिवस सोसायचा. पुर्वी दुषित पाणी निर्माण करणाऱ्या कारखांदाराविरुद्ध शेकडो शेतकऱ्यांनी रस्ता रोकोसारखी आंदोलने छेडली होती. संबंधित कार्य़कर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.
वास्तविक आंदोलकर्त्यांवर गुन्हा आणि बेकायदा नदीमध्ये दुषित पाणी सोडणाऱ्या कारखांदारांना सन्मानाची वागणून असा उलटा न्याय आजवर पोलिस, महसूल प्रशासनांसह नेतेमंडळींकडून झाला आहे,`` अशा शब्दात शेतकरी मिथून आटोळे यांनी अधिकाऱ्यांपुढे आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी सांगवीचे सरपंच चंद्रकांत तावरे, विजय तावरे आदी गावकऱ्यांनीही शेती उद्धवस्त करणारे प्रदुषण रोखणे आव्हाणात्मक ठरत असल्याचे सांगितले.
...असा खोडसाळपणा कशासाठी...!
ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे म्हणाले,``प्रदुषित नीरा नदीची पहाणी करण्यासाठी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाची कमिटी येणार अशी माहिती मिळताच संबंधित कारखांदारांनी नदीत रसायणमिश्रीत पाणी सोडणे तात्पुरते बंद केले. तसेच स्थानिक नेतेमंडळींच्या सूचनेनुसार जलसंपदा खात्याने नीरा नदीमध्ये धरणसाठ्यामधील चांगल्या पाण्याचा लोंडा सोडून दिला.
वास्तविक दुषित पाण्याची प्राप्त स्थिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिसू नये, याउद्देशाने काही नेतेमंडळींनी हा खोडसाळपणा केला आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांनी अजित पवार यांचे नाव न घेला केला.