पुणेकरांना वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच प्रशस्त रुग्णालय उभे राहणार

ज्ञानेश सावंत 
बुधवार, 1 जुलै 2020

अशी आहे योजना 
महापालिकेचे डॉ. नायडू हॉस्पिटल हे सुमारे दहा एकर जागेत विस्तारले आहे. हे रुग्णालय शहरातील पहिले आणि एकमेव साथरोग नियंत्रण रुग्णालय आहे. या संपूर्ण जागेत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या जागेत सध्या डॉ. नायडू इमारतीसह सेवकांसाठी निवास आणि अन्य काही इमारती आहेत. मात्र, नवे हॉस्पिटल बांधताना मूळ इमारत न पाडता, इतर जागेत बांधकाम केले जाणार आहे. त्यामुळे पाडण्यात येणाऱ्या इमारतींतील कामकाज अन्य ठिकाणी हलविण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शतकापूर्वीच्या ससून रुग्णालयासह पुण्यातील आरोग्य यंत्रणा पुणेकरांसाठी अपुरी ठरत असल्याचे कोरोनामुळे सिद्ध झाले आहे. मात्र, या पुढे कोरोनासारख्या साथीतही ही यंत्रणा सक्षमपणे कार्यरत राहणार आहे. हे शक्‍य होणार आहे ते महापालिकेने हाती घेतलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे. डॉ. नायडू हॉस्पिटलच्या आवारात लवकरच या महाविद्यालयासाठी इमारतीच्या पायाभरणीची कुदळ पडणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणेकरांना वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच तब्बल पाचशे खाटांचे प्रशस्त रुग्णालय उभे राहणार आहे. त्यातून तज्ज्ञ डॉक्‍टर आणि उपचार व्यवस्थेची चणचण दूर होणार आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनासारख्या आजारांवर सहजरीत्या मात करणे शक्‍य होण्याची आशाही यानिमित्ताने दिसत आहे. 

कोरोनाच्या साथीने पुण्यातील आरोग्य यंत्रणा अपुरी असल्याचे अधोरेखित केले. त्याच वेळी खासगी रुग्णालयांकडून भरमसाट बिले आकारली जात असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत नवे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याच्या योजनेला गती देण्याचा महापौर मुरलीधर मोहोळ यांचा प्रयत्न पुणेकरांसाठी आनंददायी ठरणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयातून अल्पदरात उपचार मिळणार आहेत. 

कोरोनामुक्त बारामतीत पुन्हा कोरोनाची एन्ट्री; आयटी अभियंत्यास कोरोनाची लागण

नायडू रुग्णालयाच्या आवारातील गोदाम आणि सेवकांच्या निवास व्यवस्था असलेल्या इमारती पाडण्यात येणार आहेत. सेवकांना महापालिकेच्या मिळकतींमध्ये घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तर गोदामासाठीही पुरेशी जागा देण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले.

रिक्षाचालकावर कोयत्याने सपासप वार झाले अन् उपचार सुरू करण्यापूर्वीच...

महाविद्यालयाची उद्दिष्ट्ये

  • वैद्यकीय पदवी, पदवीव्युत्तर, पदविका, सुपर स्पेशलायझेशन, दंत शिक्षण, नर्सिंग अभ्यासक्रम 
  • वैद्यकीय क्षेत्रातील नवकल्पना, संशोधन 
  • रुग्णांना अद्ययावत आणि आधुनिक उपचार 
  • गरिबांना वैद्यकीय मदत
  • आपत्तीच्या काळात मदतकार्य
  • वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रोजगार

पुणेकर जनतेसाठी पुरेशा प्रमाणात आरोग्य व्यवस्था उभारण्याच्या हेतूने वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाला लवकरच सुरुवात करणार आहोत. यामुळे पुरेशा प्रमाणात आरोग्य सुविधा म्हणजे, बेड, डॉक्‍टर आणि अन्य उपचाराची साधने उपलब्ध होतील. मात्र, नायडू हॉस्पिटलचा उद्देश कायम राहील.
- मुरलीधर मोहोळ, महापौर, पुणे

डॉ. नायडू हॉस्पिटलच्या आवारात नव्या बांधकामासाठी किती आणि कशी जागा मिळेल, याची पाहणी करून प्रत्यक्ष बांधकामाचे नियोजन करित आहोत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील कामाला लवकरच सुरुवात होईल. सध्या ज्या इमारती मोकळ्या होतील, तेथील बांधकाम करता येणार आहे.
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune residents will have a spacious hospital along with a medical college