"कम्युनिटी पोलिसिंग'ला पुणेकरांचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

नागरिकांना पोलिसांकडून नेमक्‍या कोणत्या अपेक्षा आहेत, असे आम्ही पुणेकरांना विचारले होते. त्यानुसार त्यांनी आठशेहून अधिक सूचनांद्वारे आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. संबंधित सूचनांचे समाजघटकांनुसार आम्ही वर्गीकरण करणार आहोत. त्यानंतर त्या सर्व सूचनांचा बारकाईने अभ्यास व विश्‍लेषण करून त्या सोडविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. 

- डॉ. के. वेंकटेशम, पोलिस आयुक्त 

पुणे : रॅगिंग थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा, "आयटी'तील महिलांना जादा सुरक्षा द्या, लैंगिक अत्याचारांविषयी मुलांमध्ये जागृती निर्माण करा, ज्येष्ठ नागरिकांना त्वरित ओळखपत्र द्यावे, अशा तब्बल आठशेहून अधिक सूचना पुणेकरांनी पाठविल्या आहेत. "कम्युनिटी पोलिसिंग' वाढविण्यासाठी पुणे पोलिसांनी केलेल्या आवाहनास पुणेकरांनी प्रतिसाद देत या सूचना पाठविल्या आहेत. 

शहर अधिकाधिक सुरक्षित व सुसह्य करण्यासाठी नव्या वर्षात पोलिसांनी "कम्युनिटी पोलिसिंग'साठी काय काय करायला पाहिजे? याविषयी पुणे पोलिसांनी नागरिकांकडून व्हॉट्‌सऍप, ट्विटर, पत्र व प्रत्यक्ष भेटीद्वारे सूचना करण्यास सांगितले होते. पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी त्यासाठी पुणेकरांना आवाहन केले होते. त्यानुसार विविध समाजघटकांनी त्यास प्रतिसाद दिला.

विद्यार्थी व कामगार संघटना, डॉक्‍टर, हॉटेल व्यावसायिक, माहिती तंत्रज्ञान, बॅंक, गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे, शाळा/ महाविद्यालयांचे शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी, व्यापारी- व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक, महिला संघटना, महिला, बालक व ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संघटना, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, रिक्षा संघटना व महिला संघटना अशा वेगवेगळ्या समाजघटकांनी आपल्या अपेक्षा पोलिसांकडे मांडल्या. 

काय आहेत पुणेकरांच्या पोलिसांकडून अपेक्षा? 

* विद्यार्थी/ शिक्षक/ शिक्षकेतर वर्ग 
- कायदेविषयक कार्यक्रम घ्यावा 
- रॅगिंगसारख्या गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी 
- लैंगिक अत्याचाराविषयी जागृती 

* माहिती तंत्रज्ञान क्षेत्र 
- सायबरतज्ज्ञांची मदत घेऊन सायबर गुन्हेगारीविषयी जागृती करावी 
- रात्री काम करणाऱ्या आयटीतील महिलांना सुरक्षा द्यावी 

* महिला, कामगार, सामाजिक व स्वयंसेवी संघटना 

- पोलिस दीदी/ काकांनी शाळांना भेटी द्याव्यात 
- शाळा/ महाविद्याल परिसरात मद्य, सिगारेट, तंबाखू विक्रीस बंदी घालावी 
- युवतींना स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करावे 
- कामगार चारित्र्य पडताळणी जलदगतीने व्हावी 
- अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करावी 
- भाडे नाकारणाऱ्यांवर कारवाई व्हावी 
- "गुड टच, बॅड टच'बाबत माहिती द्यावी 
- बाल गुन्हेगारी थांबविण्यासाठी प्रबोधन करावे 

* डॉक्‍टर्स 
- डॉक्‍टरांवरील हल्ले थांबविण्यासाठी सुरक्षा वाढवावी 
- प्रथमोपचाराबाबत पोलिसांनाही प्रशिक्षण द्यावे 

* बॅंकिंग क्षेत्र 
- फसवणुकीचे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांसमवेत बैठका घ्याव्यात 
- कॅश व्हॅन व कॅश ट्रान्सफर प्रक्रियेसाठी तत्काळ पोलिस संरक्षण मिळावे 
- एटीएम, डेबिट कार्ड फसवणुकीतील प्रकरणांचे तपास तातडीने करावेत 

* व्यावसायिक/ व्यापारी 
- बिलावरून होणाऱ्या वादाच्या वेळी तत्काळ मदत मिळावी 
- विनापरवाना हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करावी 
- अधिकाधिक सीसीटीव्हींचा वापर करण्यावर भर द्यावा 
- पेठांमध्ये सकाळी सहा ते नऊ व रात्री आठ ते 10 या वेळेत माल वाहतुकीसाठी सहकार्य करावे 
- व्यापारी संघटनांच्या पोलिस ठाण्यांमध्ये बैठका घ्याव्यात 

* गणेशोत्सव/ नवरात्रोत्सव मंडळे 
- पोलिस परवाने तत्काळ मिळावेत 
- गैरप्रकार करणाऱ्या मंडळांवर कडक कारवाई करावी 
- मंडळे व पोलिसांच्या बैठका व्हाव्यात 

* ज्येष्ठ नागरिक 
- ज्येष्ठ नागरिक मेळावे भरवावेत 
- ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र मिळावे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune response to Community Policing