पुणे : खड्डे प्रकरणी सहाय्यक आयुक्तांना अखेरची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

road potholes

पुणे शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली आहे.

पुणे : खड्डे प्रकरणी सहाय्यक आयुक्तांना अखेरची नोटीस

पुणे - क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील दोष दायित्व कालावधीतील (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड-डीएलपी) रस्त्यांची माहिती सादर करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी देऊन देखील पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांनी त्यावर टाळाटाळ केली आहे. त्यामुळे त्यांना आज अखेरची नोटीस बजावण्यात आली असून, तुमचे काहीच म्हणणे नाही असे ग्राह्य धरून कारवाई केली जाईल अशी तंबी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली आहे.

शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालयांकडून माहिती मागविण्यात आली आहे. १५ पैकी १० क्षेत्रीय कार्यालयांनी १ हजार ३०० पेक्षा जास्त डीएलपीतील रस्त्यांची माहिती सादर केली आहे. पण नगररस्ता-वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय, येरवडा-धानोरी-कळस क्षेत्रीय कार्यालय, ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय, धनकवडी-सहकारनगर आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय या पाच कार्यालयांनी गेल्या २० दिवसात माहिती सादर केलेली नाही.

डॉ. खेमनार यांच्यासह पथ विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवार- शनिवारी सायंकाळच्या सुमारास शहराच्या विविध रस्त्यांची पाहणी केली. रस्त्यातील खड्ड्यांचे जिओ टॅगिंगसह फोटो पथ विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवून खड्डे दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. डीएलपीतील रस्त्यांना खड्डे पडलेल्या रस्त्यांसाठी ठेकेदारांवर केलेल्या कारवाईचा अहवालही आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे, असे डॉ. खेमनार यांनी सांगितले.

दरम्यान, क्षेत्रीय कार्यालयांनी माहिती पाठवली की नाही याचा आढावा आज घेतला, पाच कार्यालयांनी अद्याप माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांना शेवटची नोटीस बजावली आहे. उद्यापर्यंत माहिती सादर न केल्यास तुमचे काहीही म्हणणे नाही असे समजून पुढील कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे, असे खेमणार यांनी सांगितले.

खड्डे बुजविण्यासाठी नवा प्रयोग

शहरातील खड्डे बुजविण्यासाठी महापालिका नवा प्रयोग करणार आहे. यासाठी मुंबईतील एका कंपनीने प्रस्ताव सादर केला आहे. या कंपनीला शंकरशेठ रस्ता, आंबेगाव रस्ता आणि अप्पर इंदिरानगरचा रस्ता प्रायोगिक तत्त्वावर काम करण्यासाठी दिला जाणार आहे. या कंपनीतर्फे रस्ते दुरुस्तीचे काम करताना वेगळ्या प्रकारचे केमिकल वापरते, तसेच काम झाल्यानंतर पुढील काही तास रस्ता पूर्णपणे बंद ठेवणे आवश्‍यक आहे. तरच रस्ता दीर्घकाळ सुरक्षीत राहील असे सांगितले आहे. त्यामुळे पुण्यासाठी हे तंत्रज्ञान योग्य राहील की नाही याबाबतचा निर्णय होणार आहे, असे खेमणार यांनी सांगितले.

Web Title: Pune Road Potholes Assistant Commissioner Notice Dr Kunal Khemnar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punepotholes