
पुणे महापालिकेच्या पथ विभागाने रस्ता केल्यानंतर मग पावसाळी गटार किंवा सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदला जातो.
Pune Road : पुण्यात रस्त्यांच्या कामात विभागांचा समन्वय! वारंवार रस्ते खोदाई टाळण्यासाठी उपाय
पुणे - महापालिकेच्या पथ विभागाने रस्ता केल्यानंतर मग पावसाळी गटार किंवा सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदला जातो. हे प्रकार वारंवार घडत असल्याने आता नवीन रस्त्याचे काम हाती घेण्यापूर्वीच त्या ठिकाणी भूमिगत सेवा वाहिन्या, जलवाहिन्या टाकण्याची सक्ती केली जाणार आहे. त्यासाठी संबंधित विभागांनी पथ विभागाशी समन्वय ठेवून अर्थसंकल्पात तरतूद करून घ्यावी, असे आदेश दिले आहेत.
रस्त्यांचा प्रश्न गंभीर झालेला आहे. मध्यवर्ती भागासह उपनगरांमधील रस्ते पाणी पुरवठा, विद्युत वाहिनी, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, मोबाईल केबल, गॅस वाहिनी यासह इतर कारणांनी खोदकाम झालेले आहेत. हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे, त्यापैकी ३२५ कोटी रुपयांच्या निविदा काढल्या असून, त्यामधून सुमारे १४० किलोमीटरचे रस्त्यांचे डांबरीकरण तर काही रस्त्यांना सिमेंटचा थर मारला जाणार आहे.
काय आहे आदेश?
पथ विभाग आणि इतर विभागांमध्ये समन्वय नसल्याने हा भुर्दंड महापालिकेला पडत आहे. यासंदर्भात नुकतीच एक बैठक झाली आहे. त्यामध्ये पथ विभागाशी संबंधित सर्व विभागांना समन्वय ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आगामी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात पथ विभागाने ज्या भागातील रस्ते प्रस्तावित केले आहेत, ही माहिती पाणीपुरवठा, विद्युत, मलनिःसारण या विभागांना देऊन देखील काम करण्यासाठी तरतूद उपलब्ध करून घ्यावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी संबंधित विभागांच्या प्रमुखांना दिले आहेत.
अशी आहे स्थिती...
महापालिकेच्या अर्थसंकल्पात शहरात नवीन रस्ते तयार करण्याचे काम करण्यासाठी पथ विभागातर्फे दरवर्षी किमान ३० ते ४० कोटी रुपयांची तरतूद केली जाते.
पण त्याच रस्त्यावर जलवाहिनी, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार टाकण्यासाठी संबंधित विभागांकडून तरतूद केलेली नसते.
यात प्रामुख्याने उपनगरांमधील विकास आराखड्यात दाखविण्यात आलेल्या रस्त्यांचा समावेश असतो.
त्यामुळे पथ विभागाने काम सुरू केले तरी त्यासोबत सेवा वाहिन्या, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटारांची व्यवस्था केलेली नसते.
रस्त्याचे काम झाल्यानंतर या भागातील पाणी रस्त्यावर तुंबते, पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने रस्ते खराब होतात.
त्यामुळे नागरिक महापालिकेच्या कारभारावर टीका करतात.
रस्त्यांची लांबी व खर्चाचे गणित...
डांबरी रस्ते - ९०० किलोमीटर
सिमेंट काँक्रिटचे रस्ते - ४०० किलोमीटर
विकसित न झालेले रस्ते - १०० किलोमीटर
सिमेंट रस्ता तयार करण्याचा प्रति चौरस मीटर खर्च - ५,००० रुपये
डांबरी रस्ता तयार करण्याचा प्रति चौरस मीटर खर्च - ३,५०० रुपये
पेव्हिंग ब्लॉक डक्टसह चौरस मीटर खर्च - ७,५०० रुपये
पथ विभागाने एखाद्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू केल्यानंतर इतर विभागांना त्यांची कामे करण्यास सांगितल्यानंतर ते निधी उपलब्ध नाहीत असे सांगतात. पण नंतर मात्र रस्ता खोदून त्यांची कामे करतात. हा प्रकार रोखण्यासाठी पथ विभाग ज्या भागात काम करणार आहे, तेथे सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, विद्युत वाहिनी यासह इतर कामे करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्याची सूचना केली गेली आहे. पुढील याच प्रमाणे कामे केली जातील.
- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका