
Pune : कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपदनासाठी २०० कोटी रुपये मंजूर; भूसंपादन आॅक्टोबरपूर्वी पूर्ण ?
पुणे - भूसंपादनामुळे रखडलेल्या कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी आॅक्टोबरपूर्वी जागा ताब्यात घेऊन लगेच त्याचे काम सुरू करू असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, राज्य सरकारकडून मंजूर झालेले २०० कोटी रुपये अद्याप महापालिकेच्या तिजोरीत जमा न झाल्याने भूसंपादन कसे करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कात्रज-कोंढवा हा रस्ता सध्या ३२ मीटरचा असला तरी तो अपुरा आहे, त्यामुळे महापालिकेने मोठा गाजावाजा करून ८४ मीटर पर्यंत रुंदीकरणाचा निर्णय घेतला. त्यामुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत होणार आहे. पण भूसंपदनाअभावी ही गेल्या पाच वर्षात केवळ २८ टक्के काम पूर्ण झाले आहे.
या रस्त्यामध्ये ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांनी महापालिकेकडे रोख नुकसान भरपाई मागितलेली आहे. त्यामुळे टीडीआर, एफएसआयच्या रूपात मोबदला घेण्यास जागा मालकांनी नकार दिला आहे. महापालिकेला या प्रकल्पासाठी २ लाख ८८ हजार चौरस मीटर जागा आवश्यक असून, अद्याप १ लाख २८ हजार चौरस मीटर जागेचे भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे हे काम ठप्प आहे.
जागा मालकांना रोख मोबदला देता यावा यासाठी महापालिकेने ८४ मीटर ऐवजी ५० मीटरचा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. भूसंपादनासाठी २८० कोटी रुपये आवश्यक आहेत. त्यातील २०० कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे.
तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच २०० कोटी रुपये मंजूर केले आहेत, असे पुण्यात बोलताना स्पष्ट केले होते. पण हा निधी अद्याप महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेला नाही. त्यामुळे महापालिका भूसंपादन कसे करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महापालिकेकडून यादी तयार
महापालिकेच्या भूसंपादन विभागाने कात्रज कोंढवा रस्त्याच्या ५० मीटरच्या रुंदीकरणामध्ये ज्या जागा मालकांचे भूखंड येतात, त्यांची यादी तयार केली आहे. त्यानुसार शासकीय नियमाने त्यांना मोबदला दिला जाणार आहे.

‘‘कात्रज कोंढवा रस्त्याच्या भूसंपदनासाठी २०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत, हे पैसे लवकरच मिळतील. जागा मालकांची यादीही तयार केली आहेत. पैसे मिळताच भूसंपादनाची प्रक्रिया आॅक्टोबर पर्यंत पूर्ण केली जाईल. त्यानंतर रस्त्याचे काम सुरू होईल. पुढील काही महिन्यात कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पूर्ण होऊ होईल.’’
- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका