'RTO'कडून 60 स्कूल बस, व्हॅन जप्त

उमेश शेळके : सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

स्वारगेट, शिवाजीनगर, लष्कर, येरवडा, बावधन आदी ठिकाणी पथक पाठवून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या 132 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी साठ वाहने जप्त केली आहेत. त्यात काही बस आणि मारुती व्हॅनचा समावेश आहे. या गाड्यांच्या चालकांनी नियमांचा भंग केला असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
- संजय राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) मंगळवारी सकाळी अचानक तपासणी केली. यात तपासलेल्या 132 वाहनांपैकी 60 वाहने दोषी आढळल्याने ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या काही दिवसांत प्रथमच 'आरटीओ'कडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना शाळेत सोडल्यानंतर ही वाहने ताब्यात घेण्यात आली असली तरी, सायंकाळी विद्यार्थ्यांना नेण्यासाठी पालकांची मोठी धावपळ उडाली.

राज्य सरकारकडून मध्यंतरी "विद्यार्थी वाहतूक नियमावली' तयार करण्यात आली आहे. यानुसार दरवर्षी पासिंग करून घेणे, बसला विशिष्ट रंग देणे, बसमध्ये अग्निशमन यंत्र, प्रथमोपचार पेटी, चालकाकडे वाहन परवाना, बसच्या पायऱ्यांचा आकार, वाहन योग्यता प्रमाणपत्र आदी अटी घालून दिल्या आहेत. या नियमावलीची अंमलबजावणी 'आरटीओ'कडून लागू करण्यात आली आहे. मात्र, चालकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने आरटीओकडून मध्यंतरी बसचालकांवर कारवाईही करण्यात आली.

मुदतीत पासिंग न करून घेणाऱ्या आणि योग्यता प्रमाणपत्र न घेणाऱ्या बस चालकांना आरटीओकडून नोटिसाही पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, बस चालकांकडून त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे अशा बस चालकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, खास पंधरा पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून कारवाईला सुरवात झाली आहे. तपासातील काही बस विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत सोडूनच ताब्यात घेण्यात आल्या.

Web Title: pune RTO seizes 60 school vans, buses