सुरक्षित प्रसूतीसाठी पुण्याला 'मान्यता'

योगीराज प्रभुणे
रविवार, 30 डिसेंबर 2018

पुण्यातील 24 रुग्णालयांना "मान्यता' प्रमाणपत्र मिळाले आहे. देशातल्या कोणत्याच एका शहरातील एवढ्या मोठ्या संख्येने हे प्रमाणपत्र अद्याप मिळाले नाही. त्यावरून पुण्यातील रुग्णालये ही सर्वोत्कृष्ट मातृत्व सेवा देण्याच्या दृष्टीने पावले उचलत असल्याचे यातून दिसते. या प्रमाणीकरणामुळे रुग्णसेवेचा दर्जा निश्‍चित उंचावेल. 

- डॉ. संजय गुप्ते, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ संघटना. 

पुणे : पुणं हे प्रसूतीसाठी देशात सर्वांत सुरक्षित शहर आहे. कारण देशातील सुरक्षित प्रसूतीसाठी राष्ट्रीय स्तरावरील "मान्यता' हे स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञ संघटनेचे अधिकृत प्रमाणपत्र मिळविणारी सर्वाधिक रुग्णालये पुण्यात आहेत. 

आई होणं हे प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. त्यामुळं प्रसूतीसाठी रुग्णालयात जाणाऱ्या गर्भवतींची आणि नवजात अर्भकाची काळजी घेणं, ही रुग्णालय किंवा प्रसूतिगृहाची जबाबदारी असते. किंबहुना हा रुग्ण हक्कदेखील आहे. एका बाजूला रुग्णाच्या रुग्णालयांकडून वाढलेल्या अपेक्षा आणि रुग्ण हक्कांबाबत जागृत होणारा समाज यामुळे सर्वोत्कृष्ट मातृत्व सेवा देणाऱ्या रुग्णालयांना, प्रसूतीगृहांना "मान्यता' या नावाने प्रमाणपत्र देण्याचा निश्‍चय "फेडरेशन ऑफ ऑबस्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटीज्‌ ऑफ इंडिया'ने (फॉग्सी) दोन वर्षांपूर्वी केला होता.

गेल्या सहा महिन्यांपासून त्याची देशभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्रात 65 रुग्णालयांना हे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यात देशभरात "मान्यता' प्रमाणपत्र मिळविणारी सर्वाधिक रुग्णालये पुण्यात आहेत. 

असे मिळते "मान्यता' प्रमाणपत्र 

खासगी रुग्णालये किंवा प्रसूतिगृहाची सर्वोत्कृष्ट मातृत्व सेवेची हमी देणारी ही अधिकृत व्यवस्था आहे. "मान्यता' प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रुग्णालयाने किंवा प्रसूतीगृहाने "फॉग्सी'ने दिलेल्या 16 प्रमुख मुद्‌द्‌यांची पूर्तता करणे आवश्‍यक आहे. त्यात डॉक्‍टर, परिचारिका यांना सर्वोत्कृष्ट मातृत्व सेवेचे प्रशिक्षण दिले जाते.

प्रत्येक वैद्यकीय आणि प्रशासकीय पातळीवर कोणती आवश्‍यक काळजी घ्यायची, याचा या प्रशिक्षणात समावेश असतो. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक परीक्षणासाठी रुग्णालयात येते. रुग्णालयाची व्यवस्था, रुग्णाची काळजी, नवजात बाळाचे सुरवातीचे संगोपन याची काटेकोर तपासणी यात होते. त्यात पात्र रुग्णालयांना राष्ट्रीय पातळीवरील "मान्यता' हे प्रमाणपत्र "फॉग्सी'तर्फे देण्यात येते.

"मॅकॉर्थर', "जॉन हाफकिन युनिव्हर्सिटी', "मर्क फॉर मदर' यांनीही या प्रकल्पात सहभाग घेतला आहे. खासगी वैद्यकीय सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुण्यातील डॉ. संजय गुप्ते, कर्नाटकमधील डॉ. हेमा दिवाकर आणि डॉ. ऋषिकेश पै यांच्या कल्पनेतून "मान्यता' या प्रमाणीकरणाची प्रक्रिया पुढे आली आहे. 

पुणे प्रशिक्षण केंद्र 

प्रसूतीगृहांमधील डॉक्‍टर आणि परिचारिकांना प्रशिक्षण देण्यासाठी देशाचे पूर्व, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर असे चार विभाग करण्यात आले आहेत. त्यात पश्‍चिम भारतातील प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र पुण्यात आहे. दक्षिण विभागाचे बंगळुरु येथे, उत्तर भरतातील लखनौ, तर आग्रा येथे पूर्व विभागाचे प्रशिक्षण केंद्र आहे. 

दृष्टिक्षेपात "मान्यता' 

प्रमाणपत्र मिळालेली देशातील रुग्णालयांची संख्या ः 65 
उत्तर प्रदेश ः 164 
झारखंड ः 73 
महाराष्ट्र ः 65 

Web Title: Pune is safe for delivery