पुणे: साहित्य परिषदेच्या आपटे ग्रंथालयाचा होणार कायापालट!

स्वप्निल जोगी
बुधवार, 24 मे 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीच्या निमित्ताने मसापने आयोजित केलेल्या बाबासाहेबांवरील ग्रंथप्रदर्शनाच्या निमित्ताने मी मसापमध्ये गेलो होतो. त्यावेळी तिथल्या ग्रंथालयातील अपुऱ्या जागेअभावी असणारी अवस्था मला बघवली गेली नाही. त्यामुळे मी माझ्या विकास निधीतून काही भाग त्याच्या नूतनिकरणासाठी देण्याचे ठरविले. आपल्या जीवनात पायाभूत सुविधांच्या इतकाच बुद्धीचे भरणपोषण करणाऱ्या ज्ञानकेंद्रांचा विकासही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे मी हा निर्णय घेतला.
- आमदार जयदेव गायकवाड

पुणे - गेली अनेक वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) माध्यमातून ग्रंथाभ्यासकांना अतिशय उपयुक्त ठरणारे असे 'कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय' आता लवकरच नव्या आणि अधिक सक्षम रूपात पाहायला मिळणार आहे. मसापच्या ज्ञानवैभवात मोलाची भर घालणाऱ्या या ग्रंथालयाच्या नूतनिकरणासाठी आमदार जयदेव गायकवाड यांनी आपल्या आमदार निधीतून चार लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

विविध विषयांवरील अभ्यासकांसाठी कित्येक संदर्भ चटकन उपलब्ध व्हावे, यासाठीची हक्काची जागा म्हणजे हे ग्रंथालय आहे. सुमारे 50 हजारहून अधिक जुने-नवे ग्रंथ, दुर्मिळ नियतकालिके, सर्व प्रकारचे कोश, संदर्भग्रंथ यांमुळे हे संदर्भ ग्रंथालय संशोधक आणि अभ्यासकांच्या नेहमीच आकर्षणाचा विषयही राहिलेले आहे. परिषदेचे आजीव सभासद, अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी, यांचा या ग्रंथालयात नेहमीच राबता असतो. त्यामुळे अनेकांनी त्याच्या नूतनिकारणाविषयी आनंद व्यक्त केला आहे.

या संदर्भात मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, "आपटे संदर्भ ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक आणि वाचकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिवाय, मौल्यवान अशा जुन्या संदर्भ ग्रंथांनी ग्रंथालयाचा बराचसा भाग व्यापलेला आहे, त्यामुळे नव्या पुस्तकांसाठी गेले काही दिवस जागा कमी पडत होती. ही गैरसोय आता निधीच्या उपलब्धतेमुळे दूर होणार असून, नवी अंतर्गत वास्तुरचना तसेच बैठकव्यवस्था उपलब्ध होऊ शकेल."

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीच्या निमित्ताने मसापने आयोजित केलेल्या बाबासाहेबांवरील ग्रंथप्रदर्शनाच्या निमित्ताने मी मसापमध्ये गेलो होतो. त्यावेळी तिथल्या ग्रंथालयातील अपुऱ्या जागेअभावी असणारी अवस्था मला बघवली गेली नाही. त्यामुळे मी माझ्या विकास निधीतून काही भाग त्याच्या नूतनिकरणासाठी देण्याचे ठरविले. आपल्या जीवनात पायाभूत सुविधांच्या इतकाच बुद्धीचे भरणपोषण करणाऱ्या ज्ञानकेंद्रांचा विकासही महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे मी हा निर्णय घेतला.
- आमदार जयदेव गायकवाड

Web Title: Pune: Sahitya Parishad's Apte Library will be transformed