
Sakal Natya Mahotsav : एका लग्नाची ‘सदाबहार’ गोष्ट; ‘सकाळ नाट्य महोत्सवा’त शुक्रवारी प्रयोग
पुणे - ‘मला सांगा सुख म्हणजे काय असतं’ असे विचारणारे प्रशांत दामले आणि त्यांच्या जोडीला कविता मेढेकर यांची प्रमुख भूमिका असलेले ‘एका लग्नाची गोष्ट’ हे नाटक काही वर्षांपूर्वी ‘सुपरहिट’ ठरले होते. याच ‘सदाबहार लग्नाची गोष्ट’ पुन्हा एकदा ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘मन्या आणि मनी’ची जोडी पुन्हा एकदा रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे.
या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी (ता. १९) ‘सकाळ नाट्य महोत्सवां’तर्गत रात्री ९.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. नाटकात प्रशांत दामले व कविता मेढेकर यांच्यासह अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर आदींच्या भूमिका आहेत. तर नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांचे आहे.
नाट्य महोत्सवातील प्रयोग असल्याने या नाटकाची तिकिटे सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. ही तिकिटे बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सकाळी ९.३० ते रात्री ९ या वेळेत तसेच, ‘बुक माय शो’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
लग्न म्हटल्यावर गमतीजमती असतातच. ज्यांचे लग्न झाले नाही, त्यांना ते करून पाहायचे असते आणि ज्यांचे लग्न झालेले असते, त्यांची पहिली काही वर्षे खूप गमतीजमतीची असतात. एकूणच हा सगळा मजेशीर मामला असतो. हीच गंमत ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकात पाहायला मिळते. प्रत्येक प्रेक्षकाला ही गोष्ट आपली वाटू शकते.
- प्रशांत दामले, प्रसिद्ध अभिनेते
तिकिटांचे दर (प्रति व्यक्ती) -
संपूर्ण महोत्सवाचे तिकिट (तळमजला) - रुपये १८००
संपूर्ण महोत्सवाचे तिकिट (बाल्कनी) - रुपये १२००
प्रतिनाटक तिकिट (तळमजला) - रुपये ४००
प्रतिनाटक तिकिट (बाल्कनी) - रुपये ३००
विद्यार्थ्यांना भरघोस सवलत
या नाट्य महोत्सवाच्या सर्वच तिकिटांवर सवलत देण्यात आली आहेच. मात्र विद्यार्थ्यांसाठीही भरघोस सवलत उपलब्ध आहे. प्रत्येक नाटकाच्या बाल्कनीतील तिकिटांवर विद्यार्थ्यांना तब्बल ५० टक्के सूट मिळणार आहे. यासह इतर सर्वच तिकिटांवर देखील वीस टक्के सवलत देण्यात आली आहे.