
Pune News : जगदगुरू संत तुकाराम महाराज बीजेचा सोहळा उत्साहात संपन्न
डोर्लेवाडी : जगदगुरू संत तुकाराम महाराज बीजेचा सोहळा डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे उत्साहात संपन्न झाला.पुणे,सोलापूर सातारा जिल्ह्यातील सुमारे ८० हजारहून अधिक भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती.
संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य धर्म केला ! हरी भजनी हें ढवळीले जग | चुकविला लाग कळिकाळाचा ॥कोणां ही नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देह बुद्धी ॥ तुका म्हणे सुख समाधि हरी कथा । नेणें भवव्यथा गाईल तो! या अभंगातून संत तुकाराम महाराज वैकुंठ गमन सोहळ्याचे वर्णन झाले.
टाळ मृदंगाच्या तालात अखंड हरिनामाचा गजर सुरु झाला...अन पुंडलिक वरदा हरी विठ्ठलचा जयघोष होताच उपस्थित हजारो भाविकांनी जड अंतकरणाने श्रींच्या मूर्तीवर गुलाल पुष्प वर्षाव करून डोर्लेवाडी (ता.बारामती) येथे संत तुकाराम बीजेचा सोहळा साजरा केला.
प्रती देहू समजल्या जाणाऱ्या येथील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात आज (ता.९ ) ८० हजार हून अधिक भाविकांनी 'याची देही याची डोळा' बीजेचा सोहळा अनुभवला. देवस्थान समिती व सांप्रदायिक भजनी मंडळाच्या वतीने बीज उत्सव सोहळ्यानिमित्त (ता.२) पासून ६४ व्या कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
शैला महाराज यादव व बाळासाहेब नाळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली टाळ मृदंगाच्या गजरात भव्य गाथा पारायण झाले.भागवत शिंदे, सोमनाथ घोगरे,विजय शेंडे,प्रा.अच्युत शिंदे,दत्तात्रय घुले,अथर्व देवकर शैला यादव यांची प्रवचने व अशोक महाराज पवार, प्रा.डॉ.गजानन महाराज व्हावळ,भगवंत महाराज चव्हाण,पुंडलिक महाराज मोरे,केशव महाराज मुळीक,दयानंद महराज कोरेगावकर यांची कीर्तने झाली.
आज पहाटेच मंदीरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. सकाळी महाभिषेक झाल्यानंतर बाळासाहेब महाराज नाळे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर लक्ष्मण महाराज कोकाटे यांचे बीजे निमित्त फुलाचे कीर्तन झाले.कीर्तनात त्यांनी संत तुकाराम महाराज यांचे जीवनचरित्र व त्यांनी समाजासाठी केलेल्या अलौकिक कार्याचे वर्णन केले.दुपारी १२ वाजता अखंड हरिनामाचा गजर झाला.
त्याच बरोबर अत्यंत जड अंतकरणाने भाविकांनी गुलाल पुष्प वर्षाव करून बीजेचा सोहळा साजरा केला. बारामती टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.दुपारी परिसरातील नामवंत भजन गायकांचा भजनाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर पारंपारिक वाद्यांच्या गजरात भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात आली.
यात्रेत राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन..
गावात मुस्लीम समाज मोठ्या संख्येने आहे.येथील यात्रेला त्यांचे पै-पाहुणे,माहेरवासीनी दरवर्षी आवर्जून येतात.मंदिरात दर्शनासह यात्रेचा आनंद कुटुंबासह लुटतात.गावात अनेक वर्षांपासून हिंदू-मुस्लीम एकत्र नांदत असल्याने यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडते.
नियोजनाने भारावले भाविक..
येथील यात्रेला पुणे सोलापूर सातारा जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी दरवर्षी येतात. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या सहकार्याने संपूर्ण मंदीर परिसर, बारामती- वालचंदनगर मार्ग व इतर अंतर्गत रस्त्यांवर सुमारे ८० हजार चौरस फुटांचे भव्य मंडप टाकण्यात आले होते.ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील स्वच्छता, रस्ते दुरुस्ती,तसेच शुद्ध पाण्याची सोय करण्यात आली होती.
बारामती शहर पोलीस स्टेशनच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.वीज मंडळाच्या वतीने अखंड वीज पुरवठा करणेत आला. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. सामाजिक संस्था व स्थानिक पदाधिकारी यांच्यावतीने मोफत पाणी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. श्रीक्षेत्र देहूला बीज सोहळ्याला जाणाऱ्या अनेक भाविकांनी येथील बीजेच्या सोहळ्याचे नियोजन उत्कृष्ट असल्याच्या भावना व्यक्त केल्या.