
पुणे जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यात १५० कोटींच्या निधीची वाढ करण्यात आली आहे. या निधी वाढीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रयत्न केले जाणार आहेत.
Chandrakant Patil : सरपंच, उपसरपंचांच्या विकासकामांचा चंद्रकांत पाटील घेणार आढावा
पुणे - पुणे जिल्ह्याच्या वार्षिक विकास आराखड्यात १५० कोटींच्या निधीची वाढ करण्यात आली आहे. या निधी वाढीच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाचे प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी गावनिहाय विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील सरपंच व उपसरसरपंचासोबत तालुकानिहाय आढावा बैठका आयोजित करणार आहे. यानुसार येत्या १ एप्रिलपासून या बैठका घेण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता.२८) येथे एका कार्यक्रमात बोलताना केली.
पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने दिले जाणाऱ्या कृषिभूषण स्व. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी, शरद आदर्श कृषीग्राम, आदर्श गोपालक, उत्कृष्ट पशुवैद्यकीय अधिकारी, आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस पुरस्कार आणि आणि शालेय क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना आज पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू, माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबूराव वायकर आदी उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, ‘ग्रामीण भाग हा देशाचा आणि राज्याचा आधार आहे. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे. ग्रामीण भागाच्या विकासासोबतच येथील संस्कृती टिकणेही आवश्यक आहे. आपली संस्कृती म्हणजेच जीवन व्यवहार आहे. हे व्यवहार गावामध्ये पहावयास मिळतो. गावांच्या उन्नतीसाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. मात्र त्यासोबतच गावातील शेती,जोडधंदे वाढले पाहिजेत. महिला व मुलांसाठी सोयी सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात.’
प्रास्ताविक आयुष प्रसाद यांनी केले. जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व गावांना या पुरस्कारांनी गौरविण्यात येत आहे. जिल्ह्यात शेती उत्पादन वाढले आहे. भूजल पातळीतही वाढ झाली आहे. कुपोषित मुलांची संख्या कमी झाली आहे. निपुण भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारली आहे. लंपी रोग नियंत्रणात आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने फिरते दवाखाने चालवून चांगले काम केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या समारंभात सन २०२० -२१ व २०२१-२२ या दोन वर्षांचे कृषी ग्राम व शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, सन २०२१-२२ चे आदर्श अंगणवाडी पर्यवेक्षक, सेविका, मदतनीस पुरस्कार, सन २०२२-२३ च्या जिल्हास्तरीय कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पुरस्कार आणि सन २०२१-२२ चे आदर्श गोपालक पुरस्कार, उत्कृष्ट पशुवैद्यकीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.