
‘हा वॉर्ड आहे की, कबूतर खाना अशी शंका यावी इतपत दुर्दशा झालेल्या ठिकाणी आमच्या रुग्णावर उपचार सुरू आहेत. रुग्ण दिवस-रात्र खोकतोय.
क्षयरुग्णांचा वॉर्ड, की कबुतरखाना! ससून रुग्णालयातील स्थिती
पुणे - ‘हा वॉर्ड आहे की, कबूतर खाना अशी शंका यावी इतपत दुर्दशा झालेल्या ठिकाणी आमच्या रुग्णावर (Patient) उपचार सुरू आहेत. रुग्ण दिवस-रात्र खोकतोय. त्याची फेफडं (फुफ्फुसे) (Lungs) आधीच खराब झाल्याचं डॉक्टरांनी (Doctor) सांगितलंय. आता तेथील कोंडीत हवेमुळे काय होईल, याची काळजी लागली आहे,’ ससून रुग्णालयातील (Sasson Hospital) क्षयरोग विभागाच्या (Department of Tuberculosis) वॉर्डमध्ये दाखल रुग्णाचे नातेवाईक सांगत होते.
हे सांगताना वयाची सत्तरी ओलांडलेल्या त्या माणसाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या. त्याच्या जवळच्या नातेवाईकाला क्षयरोगाचे निदान झाले होते. खासगी रुग्णालयातील उपचार आवाक्याबाहेर गेले. त्यामुळे ससून रुग्णालयाचा रस्ता धरल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘क्षयरोगाचे उपचार खासगी रुग्णालयात करण्याइतकी आर्थिक ताकद आमच्याकडे नाही. महागडी औषधे विकत घेता येणार नाही. त्यामुळे ससून रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टर आहे. औषधे आहेत. जेवणदेखील आहे. पण, त्याचबरोबर कबुतरांचा त्रासही आहे.'
दुसऱ्या रुग्णाचे नातेवाईक म्हणाले, 'क्षयरोगाच्या उपचारासाठी रुग्णाला दाखल केले. पण, हा वॉर्ड कोंडीत आहे. त्यामुळे येथून लवकर बाहेर काढा, असे रुग्ण एकसारखे सांगत आहे. येथून बाहेर काढून उपचारासाठी कुठे दाखल करावे, या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही.'
नेमकी समस्या काय?...
नवीन ११ मजली इमारत उभारण्यासाठी त्या जागेवर असलेला क्षयरोग विभाग पाडण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर ॲपेंडिक्सची शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात झालेली, असा ऐतिहासिक वॉर्ड तात्पुरत्या स्वरूपात क्षयरोग विभागाला दिला होता.
क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार थांबू नये, यासाठी वॉर्डमध्ये ४० खाटांची व्यवस्था केली. मात्र, ही व्यवस्था १६ वर्षांनंतरही बदलली नाही.
तज्ज्ञ काय सांगतात...
जगातील ३१ टक्के क्षयरोगाचे रुग्ण एकट्या भारतात आहे. आपलं फुफ्फुस दिवस-रात्र काम करून शरीरातील प्रत्येक पेशीला हृदयाच्या मदतीने ऊर्जा देत असतं. त्यातून पेशींमध्ये काम करण्याची क्षमता निर्माण होते. अशा अवयवाला क्षयरोग झालेल्या रुग्णावर योग्य उपचार करण्यासाठी व त्याची काळजी घेण्यासाठी सुविधांनी सुसज्ज स्वतंत्र वॉर्ड हवा.
क्षयरोग वॉर्डची रचना इतर सामान्य वॉर्डपेक्षा वेगळी असते. त्याचा संसर्ग नियंत्रित ठेवण्यासाठी ही व्यवस्था महत्त्वाची असते.
माणूस प्रत्येक मिनिटाला १२ श्वास घेतो. एका तासामध्ये ७२० ते ८०० श्वास घेतले जातात. दिवसभरात १७ ते १८ हजार वेळा श्वास घेतो. त्यामुळे प्रत्येक श्वास सुरक्षित असला पाहिजे.
आपला अनुभव काय?
ससून रुग्णालयाप्रमाणे इतर सरकारी दवाखान्यांची अशीच परिस्थिती आहे का? याबाबतचा आपला अनुभव नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या क्रमांकावर पाठवा.
Web Title: Pune Sasoon Hospital Department Of Tuberculosis Condition
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..