सातारा महामार्गाने प्रवास, नको रे बाबा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

निकृष्ट दर्जाचे काम, वेळेत काम पूर्ण न करणे, काम करणारी अपूर्ण यंत्रणा आदी कारणांमुळे पुणे- सातारा रस्त्यावर कायम खड्डे पडत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, प्रवाशांची गैरसोय होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. 
 - प्रवीण रणदिवे, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग 

खेड शिवापूर - रस्त्यावरील खड्डेच खड्डे, त्यात वाहने आदळून होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी, कोंडीत वाया जाणारे इंधन व प्रवाशांचा बहुमूल्य वेळ...राष्ट्रीय महामार्ग  पुणे- सातारा रस्त्यावरील हे चित्र आता कायमचे झाले आहे. त्यामुळे ‘पुणे- सातारा रस्त्यावरील प्रवास नको रे बाबा’, असं म्हणण्याची वेळ आली आहे.

पुणे- सातारा रस्त्याची खड्डे आणि अपूर्ण कामामुळे गेल्या अनेक दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्डे, धूळ, आणि खडीमधून वाहन चालवावे लागत असल्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी येण्यासाठी पुणे- सातारा हा मुख्य रस्ता आहे. मात्र, या रस्त्यावर प्रवाशांना कायमच खड्डे आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. 

या रस्त्यावर प्रवाशांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष करून टोलवसुली मात्र  सुरू आहे. या रस्त्यावर खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे होणारी प्रवाशांची गैरसोय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि प्रशासनाला दिसत नाही का? असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.  

या रस्त्यावर सारोळा, कामथडी, चेलाडी, वरवे आणि वेळू याठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्याठिकाणी वाहतूक कोंडी कायमची झाली आहे. प्रवाशांसह पोलिसही हैराण झाले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
पुणे- सातारा या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे डांबराऐवजी मुरूम टाकून बुजविले जात आहेत. त्यामुळेच वारंवार खड्डे पडत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune satara highway road issue