Pune News : उद्ध्वस्त इमारतीत भरतेय कागदोपत्री शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Satpura school Construction damage

Pune News : उद्ध्वस्त इमारतीत भरतेय कागदोपत्री शाळा

पुणे : सातपुड्याच्या पर्वतराजीत वसलेले धडगाव तालुक्यातील फलई गाव. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही येथे ना शाळा आहे, ना शिक्षक. आसपास शे-दीडशे विद्यार्थीसंख्या असतानाही केवळ कागदावरच शिक्षकांची शाळा भरते. गायब झालेले पत्रे आणि पडलेल्या भिंतीच्या उद्ध्वस्त इमारतीत कागदोपत्री दोन शिक्षकांची शाळा भरते. फक्त फलई गावातच नाही तर धडगाव तालुक्यातील अनेक पाड्यांवर शिक्षणाची अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

राज्यात एकीकडे कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याची चर्चा चालू सुरू असताना दुसरीकडे मुबलक विद्यार्थी संख्या असतानाही नंदुरबार जिल्ह्यातील काही शाळांमध्ये कित्येक महिन्यांतून एकदाही शिक्षक आलेले नसल्याचे चित्र आहे. यंग फाउंडेशनचे संदीप देवरे सांगतात, ‘‘धडगाव तालुक्यातील काही शाळांच्या इमारती उद्धवस्त झालेल्या आहेत.

तर काही शाळा ओस पडल्या आहेत. ज्या लहान वयात मुला-मुलींना शिक्षण मिळायला हवे, त्या वयात या मुलांना केवळ सरकारी अनास्थेमुळे व शिक्षकांच्या कामचुकारपणामुळे शेतात गुरे चारण्याचे काम करावे लागते. येथील शेकडो मुलांचे आयुष्य शिक्षणाअभावी उध्वस्त झाले असून, मुलांना अक्षर व अंक ओळख सुद्धा नाहीये.’’ शिक्षणहक्क कायद्याची पायमल्ली करणारी ही घटना यंत्रणेपासून आजवर लपून कशी राहीली, हा मोठा प्रश्न आहे.

ग्रामस्थ म्हणतात...

फलई गावात तीन-चार वर्षांपासून शाळा उद्धवस्त झाली आहे. शिक्षकांना पर्यायी जागा देऊन शिकवायला सांगितले. पण ते नुसते हो म्हणतात व येतच नाहीत. फक्त ध्वजवंदन करायला येतात. दोन शिक्षक असूनही आळीपाळीने सुद्धा येत नाही, अशी खंत ग्रामस्थ व्यक्त करत होते. सातपुड्यात दुर्गम भागातील दोन शिक्षकी शाळा असेल तर तीन-तीन दिवस एकच शिक्षक आळीपाळीने जातो. तीन शिक्षक असतील तर दोन-दोन दिवस जातात. फलईसारख्या दुर्गम गावात तर आता रस्ते होऊनही एकही शिक्षक येत नाही.

तुमच्या भागात काय परिस्थिती?

विद्यार्थीसंख्या असतानाही केवळ कागदावरच प्राथमिक शाळा भरते. या शाळेप्रमाणेच तुमच्याही भागात अशी परिस्थिती आहे का? याबाबतची माहिती आपल्या नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा.

भीषण वास्तव

  • सातपुड्याच्या दुर्गम भागात अनेक शाळा कागदोपत्री

  • तीन ते चार वर्षांपासून काही गावांतील शाळा भग्नावस्थेत

  • शिक्षकांची नेमणूक असतानाही ते शाळेवर येणे टाळतात

  • शाळाच नसल्यामुळे शेकडो मुले मूलभूत शिक्षणापासून वंचित

  • पायाभूत सुविधांच्या अभावामुळे शिक्षक विनंती करूनही शाळेवर येत नाही

तालुक्यातील काही शाळांमध्ये पुरेशा पटसंख्येअभावी व सुविधा नसल्यामुळे त्यांचे समायोजन केले आहे. अशा १६ शाळा आहेत. त्यातच ही शाळा देखील आहे. त्यामुळे अन्यत्र स्थलांतरित केली आहे.

- सतीश चौधरी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, नंदुरबार

तोरणमाळला भली मोठी इमारत उभी करून सरकारने आंतरराष्ट्रीय निवासी शाळा सुरु केली आहे. या शाळेत तोरणमाळच्या आसपासचे १६ पाड्यांतील जिल्हा परिषद शाळा समाविष्ट करून, तेथील मुलांना या शाळेत घातले आहे. परंतु, त्यात मोठ्या प्रमाणात मुलांची गळती झाली आहे. जाफी व फलई गावचे शिक्षक आपली शाळा तोरणमाळला गेली आहे, असे सांगून शाळेत येतच नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

- संदीप विनायक देवरे, धुळे