सावरकर अधिक डोळसपणे वाचले पाहिजेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sharad ponkshe

‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याचे मनावर कोरले गेले पाहिजे. देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हाच सावरकरांचे स्वप्नं पूर्ण होईल. हिंदू धर्मावर आघात करण्याचे राजकारण सुरू आहे.

Sharad Ponkshe : सावरकर अधिक डोळसपणे वाचले पाहिजेत

पुणे - ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याचे मनावर कोरले गेले पाहिजे. देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हाच सावरकरांचे स्वप्नं पूर्ण होईल. हिंदू धर्मावर आघात करण्याचे राजकारण सुरू आहे. म्हणून सावरकर अधिक डोळसपणे सातत्याने वाचले पाहिजेत,’ असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या (नाशिक) युवा आघाडी पुणे केंद्रातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘स्वा. सावरकर विचार दर्शन’ विषयावर पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ॲड. अविनाश भिडे, परेश मेहेंदळे, मकरंद माणकीकर आदी मान्यवर उपस्थित होते. पोंक्षे म्हणाले, ‘सावरकरांना सातत्याने अपमानित करण्यात आले आहे. आता त्यांचा बहुमान करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सावरकरांना जास्तीत जास्त समजून घ्या आणि इतरांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आपल्या महापुरूषांबद्दल कोणी बोलले, तर समोरच्याला वस्तुनिष्ठ माहिती देऊन उत्तर देण्यासाठी वाचन करायला हवे, समजून घेतले पाहिजे.’

‘तुम्ही टीका करत रहा, आम्ही सावरकर पोचवत राहू’, असा टोलाही पोंक्षे यांनी लगावला. ते म्हणाले, ‘स्वतंत्र भारतात सावरकरांचा सातत्याने अपमान करण्याची एकही संधी नेहरू सरकारने सोडली नाही. सावरकर समजून घेणं सोपे नाही. सातत्याने वाचावे लागते, मग ते समजायला लागतात. आपण सावरकरप्रेमी असतो, पण ५०-६० टक्के लोकांनाही त्यांच्यावर झालेले आरोप मोडून काढावेसे वाटत नाही, हे दुदैव आहे. हिंदू धर्म, हिंदुत्वाची ताकद मोडून काढण्याचे षडयंत्र सुरू आहे. सावरकरांवर प्रेम करणारी माणसे आहेत. पण त्यातून नवीन व्याख्याते, वक्ते तयार होत नाहीत. तुम्ही व्याख्याने दिली नाहीत, तरी चालतील. परंतु सावरकर वाचा, सातत्याने वाचा.’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी फडके यांनी केले.

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ पुन्हा रंगभूमीवर येणार

एकेकाळी राज्यभर गाजलेले ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येणार असल्याचा सूतोवाच अभिनेते शरद पोंक्षे यांनी केला. सावरकरांवर व्याख्यानासाठी आले असताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘या नाटकाचे आजवर ११०० हून अधिक प्रयोग केले आहेत. २०१८ मध्ये नाटकाचे प्रयोग थांबविले. परंतु आता पुन्हा एकदा येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये या नाटकाचे प्रयोग करणार आहे. त्यात पुणे आणि मुंबईमध्ये जास्त प्रयोग करण्याचे नियोजन आहे.’