पुणे : नयना पुजारी बलात्कार प्रकरणी तिघे दोषी

महेंद्र बडदे
सोमवार, 8 मे 2017

ऑक्‍टोबर 2009 मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. पुजारी यांचा मृतदेह राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे सापडला होता. त्यांच्या चेहऱ्यावर दगड मारून विद्रूप केला गेला होता. तत्पूर्वी त्यांच्यावर बलात्कार करून गळा आवळून खून केला होता.

पुणे - संगणक अभियंता नयना पुजारी यांच्यावर बलात्कार करुन खून करणाऱ्या तीन जणांना विशेष न्यायाधीश एल. एल येनकर यांनी दोषी ठरविले. सुमारे सात वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला. या दोषींना उद्या (मंगळवार) शिक्षा सुनाविण्यात येणार आहे.

योगेश अशोक राऊत (वय 24 रा. गोळेगाव, खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय 24, रा. सोळू, खेड), विश्‍वास हिंदूराव कदम (वय 26, रा. दिघी, मूळ रा. सातारा) अशी शिक्षा सुनावण्यात आणलेल्या आरोपींची नावे आहे. या गुन्ह्यातील आरोपी राजेश पांडुरंग चौधरी हा माफीचा साक्षीदार झाला, ही या खटल्याच्या सुनावणीमधील महत्वाची घटना ठरली. आरोपींविरुद्ध अपहरण, बलात्कार, खून करणे, चोरी करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले होते. 

चौधरी याचा फौजदारी दंड संहिता कलम 164 नुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदविलेला जबाब, विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी 37 जणांची नोंदविलेली साक्ष, आरोपींविरुद्ध पोलिसांनी सादर केलेला भक्कम परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावा, आरोपी आणि पीडित पुजारी यांना एकत्रित पाहणाऱ्यांची साक्ष अशा मुद्यांच्याआधारे आरोपींनीच हा गुन्हा केल्याचे सिध्द झाले. 

ऑक्‍टोबर 2009 मध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली होती. पुजारी यांचा मृतदेह राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे सापडला होता. त्यांच्या चेहऱ्यावर दगड मारून विद्रूप केला गेला होता. तत्पूर्वी त्यांच्यावर बलात्कार करून गळा आवळून खून केला होता. या गुन्ह्यातील तीन आरोपींना पोलिसांनी घटनेनंतर एका आठवड्याच्या आत अटक केले होते.

नयना पुजारी गुन्ह्याची पार्श्‍वभूमी - 
संगणक अभियंता नयना पुजारी ही 8 ऑगस्ट 2009 रोजी काम संपवून घरी जाण्यासाठी रात्री खराडी बायपास झेन्सॉर कंपनीजवळ उभी होती. कॅबचालक योगेश अशोक राऊत (वय 29, रा. घोलेगाव, आळंदी, ता. खेड) हा तेथून जात होता. त्याने नयना पुजारीला सोडण्याच्या बहाण्याने कॅबमध्ये बसवून रात्री निर्जनस्थळी नेले. तेथे त्याने आणि त्याच्या तीन मित्रांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर ओढणीने गळा आवळून दगडाने ठेचून खून केला. या घटनेने संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. तिचा मृतदेह राजगुरुनगरजवळील जरेवाडी येथे सापडला होता. 

याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी योगेश अशोक राऊत (वय 24), राजेश पांडुरंग चौधरी (वय 23, दोघे रा. गोळेगाव, खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय 24, रा. सोळू, खेड) आणि विश्‍वास हिंदूराव कदम (वय 26, रा. मरकळ, ता. खेड, मूळ रा. खटाव, जि.सातारा) या चार आरोपींना 16 ऑक्‍टोबर 2009 रोजी अटक केली. आरोपींविरुद्ध अपहरण, बलात्कार, खून करणे, चोरी करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. 

योगेश राऊत ससूनमधून झाला होता फरार
मुख्य आरोपी योगेशला 17 सप्टेंबर रोजी 2011 रोजी ससून रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक 33 मध्ये त्वचा रुग्ण विभागात नेण्यात आले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तेथे त्याचा भाऊ योगेशला भेटण्यासाठी आला होता. योगेशने त्याच्याकडून चार हजार रुपये घेतले. तेथून तो पोलिसांना चकवा देऊन लघुशंकेच्या बहाण्याने पसार झाला होता. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला अटक करण्यासाठी नागरिकांनी पोलिस आयुक्‍तालयावर मोर्चा काढला होता. पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. 

अमृतसर, दिल्लीत मुक्‍काम, शिर्डीतून केली अटक 
ससूनमधून पसार झाल्यानंतर योगेश राऊत याने रिक्षा पकडली. तेथून तो हडपसरला गेला. त्यानंतर दौंड स्थानकावरून तो रेल्वेने सूरत येथे गेला. तेथून दिल्ली येथे गेल्यानंतर काम मिळविण्याची धडपड केली. परंतु काम न मिळाल्याने तो अमृतसर येथे गेला. तेथे काही दिवस लंगरमध्ये जेवण केले. तेथील एका हॉटेलमध्ये तो काम करीत होता. तो आई आणि पत्नीला भेटण्यासाठी दोनदा पुण्यात आला होता. तो दिल्लीत असून, रवि भल्ला या नावाने त्रिलोकपुरी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांचे पथक दिल्लीला गेले. परंतु तो दिल्लीतून शिर्डीला निघाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सतिश गोवेकर यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला शिर्डीच्या बसस्थानकातून अटक केली होती. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार देविदास भंडारे, पोलिस कर्मचारी संतोष जगताप आणि प्रदीप सुर्वे यांच्या पथकाने त्याला अटक केली.

Web Title: Pune: Sessions court to pronounce judgment in Nayana Pujari rape case