pune sinhagad : पाच-सहा पिढ्या झाल्यात साहेब...... राहतं घर तरी राहुद्या; | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Sinhagad

Pune Sinhagad : पाच-सहा पिढ्या झाल्यात साहेब... राहतं घर तरी राहुद्या

सिंहगड : 'आमच्या पाच-सहा पिढ्या होऊन गेल्या आहेत तेव्हापासून आम्ही येथे राहत आहोत. बेसन-भाकर, भजी विकून पोट भरत आहोत. ज्याच्या जीवावर जगत होतो ते आमचे मोडकेतोडके शेड होते ते तर तोडलेच आहेत, किमान राहतं घर तरी राहुद्या," अशा आर्त विनवण्या करत आदिवासी महादेव कोळी समाजाचे अमोल पढेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घर पाडू नका असे सांगत होते.

सिंहगडावरील एकूण 135 लहान-मोठ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची अतिक्रमणे वन विभागाकडून जमिनदोस्त करण्यात आली. भल्या पहाटेच वन विभाग व पोलीसांचा फौजफाटा कारवाईसाठी दाखल झाला होता. गाडीतळावरील पत्र्यांच्या शेडची जेसीबी मशीनने अक्षरशः मोडतोड करण्यात आली. कारवाई दरम्यान विक्रेत्यांचा विरोध होऊ नये म्हणून गोळेवाडी तपासणी नाका, कोंढणपूर फाटा, आतकरवाडीतील पायवाट, कल्याण दरवाजा अशा सर्व ठिकाणी वन अधिकाऱ्यांसह पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.

गाडीतळावरील विक्रेत्यांचे शेड पाडण्यात आल्यानंतर गडावर जागोजागी उभारण्यात आलेले शेड व झोपड्या काढण्यात आल्या. त्याचवेळी वन विभागाने अमोल पढेर यांचे घरही पाडण्यास सुरुवात केली. 'घर पाडले तर मी राहणार कोठे? पिढ्यानपिढ्या येथेच गेल्या आहेत राहतं घर तरी राहुद्या', अशा शब्दांत भाऊक होऊन अमोल पढेर उपवनसंरक्षक राहुल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक दिपक पवार व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांना विनवण्या करत होते. वन अधिकारी मात्र ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते‌. पढेर यांना काही दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर पुन्हा कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

"आम्ही सर्वांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत आहोत. कोणालाही बेघर करण्याचा आमचा उद्देश नाही. सध्या पढेर यांच्या घराच्या बाजूने असलेले शेड काढण्यात आले आहे. त्यांची इतर ठिकाणी मालकी हक्काच्या जागी व्यवस्था करण्यात येणार आहे. कोणावरही अन्याय होणार नाही."

राहुल पाटील, उपवनसंरक्षक, पुणे.