पुणे : रहदारीच्या वेळी चारचाकी वाहनावर कोसळले वडाचे झाड

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेटजवळील घटना
Car Accident
Car Accident

किरकटवाडी : पाऊस सुरू असताना ऐन रहदारीच्या वेळी सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी गेट जवळ एक मोठे वडाचे झाड चारचाकी वाहनावर कोसळल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नसून एका व्यावसायिकाचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. मुख्य रस्त्यावर झाड आडवे पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास व्यावसायिक विकास दत्तात्रय दांगट हे आपल्या चारचाकी गाडीने सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथील त्यांच्या ऑफीसकडे चालले होते. नांदेड सिटी गेट जवळील वजन काट्यासमोर आल्यानंतर जोराचा आवाज झाला व भले मोठे जीर्ण झालेले वडाचे झाडा गाडीवर कोसळले. यात दांगट यांच्या चारचाकी गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे आजुबाजुला असणारे वाहन चालक व व्यावसायिकांनी मदतीसाठी धाव घेतली आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पीएमआरडीए च्या अग्निशमन दलाच्या सोन्याबापू नागरे,शुभम माळी, श्रीकांत आढाव व किशोर काळभोर या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत झाड हटविण्यास सुरुवात केली. घटनेची माहिती मिळताच पुणे शहर वाहतूक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते.

तर ही दुर्घटना टळली असती........ रस्त्याचे काम सुरू असल्याने काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेने असलेली ही जीर्ण वडाची व इतर झाडे काढण्याची रितसर परवानगी घेतली होती मात्र 'काही' पर्यावरण प्रेमींनी झाडे तोडण्यास विरोध केल्याने हे काम झाले नाही. जर त्यावेळी काम झाले असते तर आज ही घटना घडली नसती. मागील वर्षीही रात्रीच्या सुमारास येथील वडाचे झाड रस्त्यावर कोसळून पूर्ण वाहतूक बंद झाली होती. सुदैवाने तेव्हाही कोणाला दुखापत झाली नव्हती. अद्यापही वेळ गेलेली नाही त्यामुळे प्रशासनाने ही जीर्ण झाडे वेळीच काढून घ्यावीत अशी मागणी नागरिक करीत आहेत."ऑफीसमध्ये काम असल्याने चालक येण्याच्या अगोदर मी एकटाच गाडी घेऊन आलो होतो. पाऊस सुरु होता व वाहनांचीही गर्दी होती. काही कळण्याच्या आत भले मोठे झाड गाडीवर कोसळले. अजून एक फूट जरी गाडी पुढे गेली असती तरी अघटीत घडले असते." विकास दत्तात्रय दांगट, व्यावसायिक, नांदेड फाटा.

"जवळच चहाच्या टपरीजवळ आम्ही उभे होतो. अचानक गाडीवर झाड कोसळताना दिसले व आम्ही सर्वजण मदतीसाठी धावलो. काही दुचाकी चालकही थोडक्यात बचावले." अशोक भड, टेंपोचालक."माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी जाण्यास सांगितले. सुदैवाने कोणीही जखमी नसल्याची माहिती मिळाली आहे." उदयसिंह शिंगाडे, पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड वाहतूक शाखा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com