सव्वा किलोमीटरसाठी पाऊण तास; पुण्यातील स्थिती

सिंहगड रस्ता - आनंदनगर चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चालकांना कसरत करावी लागते.
सिंहगड रस्ता - आनंदनगर चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे चालकांना कसरत करावी लागते.

सिंहगड रस्ता - वेळ संध्याकाळची. डाव्या बाजूने वाहनांच्या रांगा. इंच इंच लढवू अशी वाहनांची स्थिती. एका बाजूला चारचाकी, तर दुसऱ्या बाजूला दुचाकी वाहनांच्या रांगा. त्यातूनही घरी लवकर जाण्यासाठी गडबड. दुसऱ्या बाजूस आनंदनगर चौकाकडे येणाऱ्या वाहनांच्या रांगा. दोन्ही बाजू वाहनांनी खचाखच भरलेल्या... अशी स्थिती आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर चौक ते सनसिटी या भागातील रस्त्याची. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भा. द. खेर चौक अर्थात आनंदनगर चौकातून संध्याकाळी घरी परतणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र आनंदनगर चौक ते सनसिटी हे केवळ एक ते सव्वा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी नागरिकांना वाहनाने कमीत कमी चाळीस मिनीटे लागतात. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीस नागरिक वैतागले आहेत.

भा. द. खेर चौकातून उजव्या बाजूस आत वळताना गल्ली क्रमांक एक ते चार. त्यानंतर येणारा ओढ्यावरील पूल, शिवपुष्पपार्क चौक, विश्‍व मेडीकल येथील चौक, मारुती मंदिर चौक ते सन ऑरबीटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा असतात. या भागातील रस्ता चिंचोळा आहे. त्यानंतर देखील वाहनांच्या रांगा कायम असतात. ते अग्निशमन केंद्रापर्यंत तेथून पुढे पुन्हा रस्ता अधिक निमुळता होतो आणि कोंडीत भर पडते. या सगळ्यांत भर म्हणून महामार्गाकडून येणाऱ्या वाहतुकीची झालेली भर. त्यामुळे रस्ता अधिक अरुंद होत जातो. त्यामुळे एक ते सव्वा किलोमीटरच्या अंतरासाठी कमीत कमी चाळीस मिनीटे लागतात. यावर कायम स्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

कोंडीची कारणे

  • मारुती मंदिरपर्यंत अरुंद रस्ता
  • जागोजागी अतिक्रमणे
  • सुशोभीकरणात गेलेली जागा
  • अनधिकृत वाहनतळ
  • अनधिकृत विक्रेते
  • प्रयेजा सिटीचा पूल नसल्याने वाढलेली वाहतूक
  • रस्त्यात असलेले वीजवितरणचे रोहित्र.
  • दुकानदारांनी अनधिकृत बांधलेले ओटे, पायऱ्या आणि त्यांचे रस्त्यावरील सामान

जागरूक नागरिकांचा उपक्रम
या परिसरात वाहतूक नियमन करण्यासाठी काही नागरिक, तरुण, तरुणी स्वत:हून पुढे येतात. विश्‍व मेडिकलच्या चौकात तीन ठिकाणी रस्ते जातात. सनसिटीकडून शिवपुष्पपार्ककडे जाणारा आणि येणारा, तसेच या दोन्ही ठिकाणाहून माणिकबागकडे जाणारा रस्ता या त्रिफुल्यात चेतन कुलकर्णी, आदित्य सहस्रबुद्धे, स्नेहा भट, कुणाल आपस्तंभ, समीर रूपदे, रेणुका कारंडे, प्रिया कुलकर्णी हे सामाजिक भावनेतून वाहतूक नियंत्रण करीत असतात.

महापालिकेच्या वतीने प्रयेजा सिटीचा पूल लवकर पूर्ण होणे आवश्‍यक आहे. तोपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांची नेमणूक करू.
- नंदकिशोर शेळके, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाहतूक विभाग

सचिन मोटे (व्हॅनचालक) - सध्या शाळा नाहीत. मात्र शाळा सुरू असताना या भागातून विद्यार्थ्यांना नेताना कसरत करावी लागते. वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यास उशीर होतो. शिवाय, सुरक्षित प्रवासाचा प्रश्‍न कायम आहे. 

मनीषा वरक - भा. द. खेर चौकातून घरी येण्यासाठी तब्बल सत्तेचाळीस मिनिटे लागतात. कार्यालयातून घरी येण्यासाठी एवढा वेळ लागतो. त्यामुळे वेळेचे गणित कोलमडते. 

मिलिंद पाटील (आनंदनगर) - भारती बझारसमोरील रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत फरक पडेल. रस्त्याचे डांबरीकरण झाले तर वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. 

सुरेश पंधारे (ज्येष्ठ नागरिक, लक्ष्मीगंगा सोसायटी) - संध्याकाळी रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. रस्त्यावर चालतादेखील येत नाही. दुचाकी, चारचाकी, मोठी वाहने, बस या सगळ्यांमुळे रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. रस्त्यातील अतिक्रमणे काढून मोठे करणे आवश्‍यक आहे. 

रवींद्र कुंदणनाड (आनंदनगर) - रुंदीकरणासाठी रस्ता ताब्यात आल्याचा गाजावाजा करण्यात आला; मात्र प्रत्यक्षात रस्ताच नाही. केवळ श्रेयवाद सुरू आहे. वाहतुकीचा प्रश्‍न प्राधान्याने सोडविणे आवश्‍यक आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com