पुणे-सोलापूर "डेमू' उद्यापासून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

पुणे - गेल्या काही महिन्यांपासून यार्डात उभ्या असलेल्या डेमू गाड्या (डिझेल मल्टिपल युनिट) अखेर मार्गावर आणण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. पुणे-मिरज मार्गावर या गाडीची यशस्वी चाचणी झाल्यानंतर पुणे-सोलापूर या मार्गावर नुकतीच चाचणी घेण्यात आली. येत्या मंगळवार (ता.3) पासून पुणे- सोलापूर-पुणे या मार्गावर ही गाडी सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

पुणे-दौंड या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून डेमू गाडी सुरू करण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे या गाडीच्या वेळेत बदल करून त्या मार्गावर पॅसेंजर गाडी सोडण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात तीन डेमू गाड्या पुणे स्थानकात दाखल झाल्या. तेव्हापासून त्या खडकी यार्डातच उभ्या आहेत. असे असतानाच गेल्या महिन्यात आणखी एक डेमू गाडी पुणे स्थानकात दाखल झाली. ती गाडी हडपसर येथील स्थानकात उभी होती. त्यामुळे प्रवाशांची गरज असूनही रेल्वेकडून या गाड्या सुरू केल्या जात नसल्याचे वृत्त "सकाळ'ने दिले होते.

त्यांची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने अखेर पुणे-सोलापूर-पुणे या मार्गावर डेमू गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सकाळी एक गाडी सोलापूरला जाणार असून, सायंकाळी तीच गाडी पुन्हा पुण्याला येणार आहे. यापूर्वी या मार्गावर तिची चाचणी घेण्यात आली आहे. या संदर्भात रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षा शहा म्हणाल्या, 'सकाळी सोलापूर आणि पुणे या दोन्ही स्थानकावरून प्रत्येक एक गाडी सोडण्याची गरज आहे. तसे झाल्यास पंढरपूर, तुळजापूर, गाणगापूर आणि अक्‍कलकोटला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सोय होईल.''

प्रस्तावित वेळा
पुण्यातून सकाळी 8.15 वाजता निघेल आणि सोलापुरात दुपारी 3.50 वाजचा पोचेल
सोलापूरातून रात्री 11 वाजता निघेल आणि सकाळी 6:00 वाजता पोचेल

Web Title: pune-solapur demu